
IDBI Bank : सरकार आता आणखी एका सरकारी बँकेतील आपला वाटा विकत आहे. प्रदीर्घकाळानंतर सप्टेंबर २०२५ पर्यंत या बँकेसाठी बोली लावण्यात येणार आहे. या बातमीनंतर IDBI च्या शेअरचे भाव वाढले आहेत. ज्या लोकांची या बँकेत खाते आहे. त्यांचे टेन्शन वाढले आहे. लोकांना आता या बँकेतील खाते बदलावे लागणार का असा संशय आहे. परंतू या सरकारी बँकेच्या खाजगीकरणाचा कोणताही तोटा तिच्या सध्याच्या ग्राहकांना होणार नाही. तुमचे या बँकेत खाते असू दे की लोन यावर काहीही परिणाम होणार नाही. तुमचे खाते जसच्या तसेच राहाणार आहे.
आयडीबीआय बँकेचे शेअर सोमवारी 4 टक्के वाढून 105 रुपयांपर्यंत पोहचले आहेत. या बँकेतील आपला वाटा सरकार विकणार असून त्यासाठी टेंडर मागविण्याची प्रक्रीया सुरु झाल्याच्या बातम्या आल्यानंतर या बँकेचे शेअरचे भाव वाढले आहेत. बऱ्याच काळापासून रखडलेली ही प्रक्रीया आता सप्टेंबरमध्ये मार्गी लागणार आहे. बँकेने या बातम्यांवर कोणतीही प्रतिक्रीया दिलेली नाही. केंद्र सरकार संभावित खरेदीदारांसोबत शेअर खरेदीच्या करारांना अंतिम स्वरुप देण्याच्या जवळ पोहचली आहे. लवकरच अशा व्यवहारांवर देखरेख ठेवणाऱ्या मंत्रीस्तरीय पॅनलची मंजूरी यासाठी सरकार मागू शकते. त्यानंतर हा खरेदी व्यवहार पूर्ण होणार आहे.
आयडीबीआय बँकेचे शेअर विक्रीत गेल्या तीन वर्षांत अनेकदा उशीर झाला आहे. सध्या केंद्र सरकार आणि भारतीय जीवन विमा निगम ( एलआयसी ) जवळ बँकेचे सुमारे 95 टक्के वाटा आहे. गुंतवणूक योजनेंतर्गत यात 60.72 टक्के हिस्सेदारी विकली जाणार आहे. गेल्या वर्षांपेक्षा स्वतंत्र राहून केंद्रीय बजेट 2025 मध्ये कोणताही विशिष्ट गुंतवणूक लक्ष्य निर्धारित केलेले नाही. त्याऐवजी, सरकारने निर्गुंतवणुकीतून आणि मालमत्तेच्या चलनीकरणातून मिळणारे उत्पन्न ‘विविध भांडवली प्राप्ती’ नावाच्या एकाच श्रेणीत ठेवले, ज्याचे आर्थिक वर्षासाठी 47,000 कोटी रुपयांचे लक्ष्य होते. गेल्या आर्थिक वर्षात, सरकारने निर्गुंतवणुकीतून सुमारे 30,000 कोटी रुपये उभारण्यात यश मिळवले. अधिकाऱ्यांना आशा आहे की आयडीबीआय बँकेसारख्या मोठ्या विक्रीमुळे आर्थिक वर्ष 26 मध्ये महसूल वाढण्यास मदत होईल.
आयडीबीआयने साल 2025 मध्ये चांगली कामगिरी केली आहे. या वर्षी आतापर्यंत बँकेचे शेअरमध्ये सुमारे 35 टक्क्यांची वाढ झाली आहे. बँकेची आर्थिक परिणाम देखील चांगले होते. आर्थिक वर्ष 25 च्या जानेवारी-मार्च कालावधीत आयडीबीआय बँकेने वार्षिक आधारे 26 टक्क्यांच्या वाढीसह 2,051 कोटींचा शुद्ध लाभ नोंदवला आहे. गेल्या वर्षी याच काळात तो 1,628 कोटी रुपये इतका होता. परंतू या दरम्यान बँकेचे शुद्धव्याज उत्पन्न ( एनआयआय ) एक वर्षांआधी 3,688 कोटी रुपयांवरुन 11 टक्के घसरुन 3,290 कोटी रुपये राहीले आहे.