
जगभरात महागाईचा आगडोंब उसळला आहे, महागाई वाढतच चालली आहे. महागाई वाढत असल्यामुळे जगात मोठ्या प्रमाणात राजकीय आणि आर्थिक अस्थिरता देखील दिसून येत आहे. शेअर बाजारात देखील कधी तेजी तर कधी मंदीचं वातावरण पहायला मिळत आहे. त्यामुळे अशा अस्थिर वातावरणामध्ये जेव्हा गुंतवणुकीचा प्रश्न येतो, तेव्हा गुंतवणूकदार सर्वात जास्त विश्वास हा सोन्यावर करतात. सोन्यांचे दागिने हा केवळ आपल्या संस्कृतीचाच भाग नाही, तर आपण जेव्हा कधी एखाद्या मोठ्या संकटात सापडू तेव्हा सोन्यामध्ये केलेली आर्थिक गुंतवणूक आपल्या कामी येऊ शकते. गेल्या काही वर्षांपासून सोन्याच्या किंमती सातत्यानं वाढतच चालल्या आहेत, सध्या सोन्याचे दर एवढ्या रेकॉर्ड ब्रेक स्थानावर आहेत, की आता सोन्याची खरेदी करणं हे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर होत चाललं आहे. गेल्या काही वर्षांमध्ये ज्यांनी सोन्यामध्ये गुंतवणूक केली त्यांना चांगला परतावा देखील सोन्यानं मिळून दिला आहे.
मागी 20 ते 25 वर्षांचा विचार केला तर सोन्याच्या भावामध्ये अनेकपटींनी वाढ झाली आहे. वर्ष 2000 मध्ये एक तोळा सोन्याची किंमत 4,400 एवढी होती. तर 2025 मध्ये एक तोळा सोन्याची किंमत जवळपास 1 लाख 30 हजारांच्या घरात पोहोचली आहे. सोन्याच्या दरात ज्या पद्धतीने वाढ सुरू आहे, ते पाहून गुंतवणूकदारांच्या मनात नक्कीच हा प्रश्न आला असेल की जर आपण 2025 ला दोन लाखांचं सोनं खरेदी केलं तर 2035 ला आपल्याला त्यातून किती परतावा मिळू शकतो? चला तर मग जाणून घेऊयात या प्रश्नाचं उत्तर
जर तुम्ही आज म्हणजे 2025 मध्ये दोन लाखांचं सोन खरेदी केलं तर ते दहा वर्षांनंतर म्हणजे 2035 ला त्याची किंमती किती होऊ शकते? सोन्याचे दर सध्या ज्या गतीनं वाढत आहेत, त्यावरू याबाबत आपल्याला अंदाज लावता येतो. गेल्या दोन वर्षांमध्ये सोन्याच्या दरात आठ ते बारा टक्के एवढी वाढ झाली आहे. याच आधारावर भविष्यातील अंदाज वर्तवला जाऊ शकतो.
जर सोन्याचे दर पुढील दहा वर्षांमध्ये 8 टक्क्यांनी जरी वाढले तरी तुम्हाला दोन लाख रुपयांच्या सोन्यातील गुंतवणुकीमध्ये 4 लाख 30 हजारांचा परतावा मिळू शकतो. याचाच अर्थ तुम्हाला दोन लाख रुपयांच्या गुंतवणुकीमध्ये दहा वर्षांनंतर दोन लाख तीस हजार रुपयांचा फायदा मिळू शकेल. जर सोन्याचे दर पुढील दहा वर्षांमध्ये 10 टक्क्यांनी वाढले तर तुम्हाला 5 लाख वीस हजारांचा परतावा मिळू शकतो. आणि सोन्याचे दर जर 12 टक्क्यांनी वाढले तर तुम्हाला दोन लाख रुपयांमधून तब्बल तिप्पट म्हणजे 6.2 लाख रुपयांचा परतावा मिळू शकतो.