Gold Demand : सोने खरेदीदारांची संख्या रोडावली! गेल्या 6 वर्षांत मागणीत इतकी मोठी घसरण

| Updated on: May 06, 2023 | 9:58 AM

Gold Demand : सोन्यात विक्रमी भाववाढ झाली. गेल्या दहा वर्षांत सोन्याने मोठी भरारी घेतली. पण त्यामुळे खरेदीदारांची संख्या रोडावली आहे. गेल्या 6 वर्षांत मागणीत प्रचंड घसरण झाली आहे. गुंतवणूकदारांनी दुसरे पर्याय शोधले आहे.

Gold Demand : सोने खरेदीदारांची संख्या रोडावली! गेल्या 6 वर्षांत मागणीत इतकी मोठी घसरण
Follow us on

नवी दिल्ली : सोन्यात विक्रमी भाववाढ (Gold Record Hike) झाली. गेल्या दहा वर्षांत सोन्याने मोठी भरारी घेतली. सध्या सोन्याचा भाव 63,000 रुपयांच्या घरात आहे. सोने लवकरच 70,000 हजारांचा टप्पा ओलांडेल, असा अंदाज बांधण्यात येत आहे. वाढत्या किंमतींमुळे खरेदीदारांनी सोने-चांदीकडे पाठ फिरवली आहे. गुंतवणूक आवक्याबाहेर गेल्याने त्यांनी दुसरा पर्याय शोधला आहे. भारतात सोन्याच्या मागणीत मोठी घसरण झाली आहे. वर्ल्ड गोल्ड काऊंसिलच्या (World Gold Council) अहवालानुसार, गेल्या 6 वर्षांत मागणीत प्रचंड घसरण झाली आहे. भारतात सोने खरेदीदारांची संख्या रोडावली आहे.

किंमतीत 10 टक्के वाढ
गेल्या काही दिवसांपासून सोन्यात सातत्याने वाढ होत आहे. 2 फेब्रुवारी 2023 रोजी आणि 5 एप्रिल 2023 रोजी सोने-चांदीने दरवाढीचा विक्रम नावावर केला आहे. आता सोने 65,000 रुपये प्रति 10 ग्रॅमचा टप्पा ओलांडणार असा तज्ज्ञांचा दावा आहे. यावर्षांत सोन्याच्या किंमतीत 10 टक्क्यांची वाढ झाली आहे.

गेल्या 6 वर्षांत किंमतीत इतकी घसरण
सोन्याच्या वाढत्या किंमतींमुळे गेल्या 6 वर्षांत सोन्याला उठाव मिळत नसल्याचे चित्र आहे. मागणीत प्रचंड घसरण झाली आहे. वर्ल्ड गोल्ड काऊंसिलच्या अहवालानुसार, एक वर्षांत सोन्याच्या मागणीत 17 टक्के घट झाली. आर्थिक वर्ष 2021-22 च्या चौथ्या तिमाहीत 135 टन सोने आयात झाले. आर्थिक वर्ष 2022—23 च्या मार्च तिमाहीत ही मागणी घसरुन 112 टनवर आली. मूल्यआधारीत विचार करता, 9 टक्के घट झाली. मार्च तिमाहीत हा आकडा 56,220 कोटी रुपयांवर आला. गेल्या आर्थिक वर्षांतील याच तिमाहीत हा आकडा 61,540 कोटी रुपये होता.

हे सुद्धा वाचा

दागिन्यांच्या मागणीत घसरण
दागिन्यांच्या मागणीत पण घसरण दिसून आली. गेल्या सहा वर्षांत हा सर्वात निच्चांकी आकडा आहे. यावेळी सोन्याच्या दागिन्यांची मागणी 78 टन होती. गेल्यावर्षी याच कालावधीत ही मागणी 94 टन होती. म्हणजे एकाच वर्षात सोन्याच्या दागिन्यांच्या मागणीत 17 टक्के घसरण झाली. मूल्याआधारीत विचार करता या तिमाहीत हा आकडा 390 कोटी रुपये होता. गेल्यावर्षी समान तिमाहीत हा आकडा 428 कोटी रुपये होता. तर गुंतवणूकदारांनी पण खरेदी कमी केली आहे. गुंतवणूकीसाठीची मागणी 41 टनाहून थेट 34 टनावर आली आहे.

सोन्याचा पूनर्वापर वाढला
सोन्याचा पूनर्वापर मात्र वाढला आहे. या सोन्यात 25 टक्क्यांची वाढ दिसून आली आहे. या दरम्यान सोन्याच्या मागणी 30 टनाहून 35 टन इतकी झाली आहे. सोन्याच्या वाढत्या किंमतींमुळे जुने सोने मोड करुन त्यात काही सोन्याची भर घालून त्याचा वापर वाढला आहे. त्याचा पण सोन्याच्या मागणीला फटका बसला आहे.