Petrol-Diesel Price : पेट्रोल-डिझेल महागणार? मध्य-पूर्वेतील काय ती वार्ता

Israel-Iran War : इराण आणि इस्त्रायल यांच्यातील युद्ध लांबण्याची भीती व्यक्त होत आहे. दोन्ही देश इरेला पेटले आहेत. त्यात अमेरिका पडद्यामागून मोठी खेळी खेळत आहे. त्यामुळे देशात इंधनाच्या किंमती भडकण्याची भीती व्यक्त होत आहे.

Petrol-Diesel Price : पेट्रोल-डिझेल महागणार? मध्य-पूर्वेतील काय ती वार्ता
इराण-इस्त्रायल युद्धाचे परिणाम
Image Credit source: गुगल
| Updated on: Jun 17, 2025 | 8:55 AM

इस्त्रायल आणि इराण या दोन्ही देशात गेल्या पाच दिवसांपासून भीषण युद्ध सुरू आहे. त्यात अमेरिका पडद्याआडून मोठी खेळी खेळत आहे. तेहरानवर अणूप्रकल्पाविषयीची माहिती देण्यासाठी दबाव आहे. दोन्ही देशात युद्ध ताणण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. त्याचा थेट परिणाम भारतीय ग्राहकांवर दिसून येईल. युद्ध पार मध्य-पूर्वेत होत असले तरी देशात इंधनाच्या किंमती भडकण्याची शक्यता आहे. देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमती स्थिर ठेवण्याच्या केंद्र सरकारच्या प्रयत्नांना हा मोठा सुरुंग मानण्यात येत आहे.

भारताला स्वस्त इंधन मिळण्यात अडचण

इस्त्रायल आणि इराण हे दोन्ही देश भारताचे खास मित्र आहे. दोन्ही देशांशी चांगले संबंध असणाऱ्या मोजक्याच देशात भारत आहे. भारत इराणकडून मोठ्या प्रमाणात कच्चे तेल खरेदी करतो. रशियाप्रमाणेच इराण भारताला कच्चे तेल खरेदीत घसघशीत सूट, सवलत देतो. आता युद्ध सुरू असल्याने कच्च्या तेलाच्या उत्पादनात कमी येण्याची, उत्पादन घटण्याची शक्यता बळावली आहे. त्याचा थेट परिणाम क्रूड ऑईल आयातीवर होईल.

इराणमधून आयात-निर्यात महागणार

आण्विक शस्त्र कार्यक्रमातून इराण जोपर्यंत मागे हटणार नाही तोपर्यंत अमेरिका इस्त्रायलच्या आड या देशाची अशीच नाकाबंदी करण्याची शक्यता आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तर इराणला उघड धमकी सुद्धा दिली आहे. अमेरिका नवीन आर्थिक प्रतिबंध लावण्याची शक्यता आहे. कच्चा तेलासह ड्रायफ्रूटही इराणमधूनच भारतात येतात. तर भारत बासमती तांदळासह, साखर, चहा-कॉफीची इराणला निर्यात करतो. इराणमध्ये पायाभूत सुविधा उभारण्यात अनेक भारतीय कंपन्या या देशात सध्या कार्यरत आहेत. जर अमेरिकेने आर्थिक प्रतिबंध घातले तर भारतीय कंपन्यांना तिथे काम करणे अवघड होईल.

कच्चा तेलाच्या किंमतीत उसळी

इराण-इस्त्रायल युद्ध काळात कच्चे तेलाच्या किंमतीत 9 टक्क्यांची उसळी दिसून आली. जर युद्ध थांबले नाही तर कच्चा तेलाचा भाव 78 हून 100 डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहचण्याची भीती व्यक्त होत आहे. त्याचा फटका भारतासह सर्व तेल आयातदार देशांना बसेल. या देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ होण्याची भीती आहे. देशात गेल्यात तीन-चार वर्षांपासून पेट्रोल-डिझेलच्या किंमती स्थिर ठेवण्याकडे केंद्र सरकारचा कसोशीने प्रयत्न सुरू आहे. या प्रयत्नाला सुरूंग लागण्याची भीती व्यक्त हो आहे.