Kishore Biyani : वास्तव तर स्वीकारावेच लागेल..बिग बाजारचे संस्थापक किशोर बियाणी असे का म्हणाले, कशामुळे दिला रिटेल किंगने राजीनामा

| Updated on: Jan 26, 2023 | 10:32 AM

Kishore Biyani : भारतात सुपर मार्केटचे युग आणण्यात मोठा वाटा असलेले किशोर बियाणी यांनी का दिला राजीनामा..

Kishore Biyani : वास्तव तर स्वीकारावेच लागेल..बिग बाजारचे संस्थापक किशोर बियाणी असे का म्हणाले, कशामुळे दिला रिटेल किंगने राजीनामा
राजीनाम्याचा कठोर निर्णय
Follow us on

नवी दिल्ली : ‘आता वास्तव तर स्वीकारावेच लागेल’, उद्योगपती किशोर बियाणी (Kishore Biyani) यांनी राजीनामा देताना केलेले हे विधान सर्वांच्याच मनात घर करुन गेले. या वक्तव्यातच त्यांच्या राजीनाम्याची (Resign) कारणं दडलेली आहेत. एवढे मोठे साम्राज्य उभारल्यानंतर त्याच्या अध्यक्षपदाचा, संचालकपदाचा राजीनामा दिला. बाजारात त्यांनी राजीनामा का दिला, त्यामागील कारणं जवळपास सर्वांनाच माहिती आहे. पण सर्वसामान्य गुंतवणूकदारांना याविषयी माहिती नाही. बिग बाजार (Big Bazar) सुरु करणारी कंपनी फ्युचर रिटेल लिमिटेडचे (FRL) भविष्य अंधारत गेले आहे. ही कंपनी कर्जात डुबली आहे. कंपनीचे दिवाळे निघाले आहे. त्यासंबंधीची कार्यवाही सध्या सुरु आहे.

त्यानंतर आता उद्योगपती किशोर बियाणी यांनी फ्युचर रिटेल लिमिटेडच्या निलंबित संचालक मंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. याविषयीची माहिती शेअर बाजाराला देण्यात आली आहे. त्यानुसार, कंपनीचे कार्यकारी अध्यक्ष आणि संचालक बियाणी यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे.

दिवाळखोरी आणि दिवाळखोरी संहिता (IBC) अंतर्गत कमिटी ऑफ क्रेडिटर्स (CoC) सध्या या कंपनीच्या दिवाळीखोरीविषयीची प्रक्रिया पूर्ण करत आहे. या समितीसमोर बियाणी यांचा राजीनामा सादर करण्यात येईल.

हे सुद्धा वाचा

कंपनीच्या रिझोल्यूशन प्रोफेशनलला या राजीनाम्याची कल्पना देण्यात आली आहे. 24 जानेवारी 2023 रोजी ईमेलद्वारे ही सूचना देण्यात आली. बँक ऑफ इंडियाकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड न केल्याने फ्युचर रिटेल लिमिटेडला दिवाळखोरीच्या कारवाईचा सामना करावा लागत आहे.

2007 पासून किशोर बियाणी फ्युचर रिटेल लिमिटेडसोबत जोडलेले आहेत. राजीनामा देताना ते भावूक झाले. ही कंपनी आपल्यासाठी सर्वात महत्वपूर्ण होती. कंपनीच्या विकासासाठी आपण रात्रंदिवस झटलो. पण आता वास्तव स्वीकारावे लागेल आणि आता पुढचा प्रवास करावा लागेल, अशी भावनिक प्रतिक्रिया त्यांनी दिली.

किशोर बियाणी यांना भारताचे रिटेल किंग म्हणून ओळखले जात होते. भारतातील किरकोळ बाजारात त्यांनी एकेकाळी तुफान आणले होते. त्यांच्या फ्युचर रिटेलने बिग बाजार, ईझीडे, फुडहॉल सारखे अनेक ब्रँड बाजारात उतरवले होते.

हायपर मार्केट, सुपर मार्केट आणि होम सेगमेंटमध्ये त्यांनी जोरदार घोडदौड केली होती. फ्युचर रिटेल देशातील 430 शहरातील 1500 हून अधिक आऊटलेटच्या माध्यमातून व्यवसाय करत होती. राजीनामा दिला असला तरी या समूहाच्या पाठिशी नेहमी असल्याचे बियाणी यांनी स्पष्ट केले.