LPG e-KYC Last Date : 16 ऑगस्टची Deadline चुकली? आता LPG ग्राहकांनी काय करावं?
LPG e-KYC Last Date : 16 ऑगस्ट रोजी एलपीजी ई-केवायसीसाठी शेवटची तारीख होती. मात्र ज्या लोकांनी डेडलाइनपर्यंत केवायसी पूर्ण केली नाही, त्यांच्या गॅस कनेक्शनचं आता काय होणार ? ते रद्द होणार का ? की सिलेंडर मिळणार नाही ? त्यासाठी जास्त पैसे मोजावे लागणार का ? सर्व प्रश्नांची उत्तर जाणून घ्या सविस्तर...

LPG e-KYC: LPG ग्राहकांसाठी महत्वाची बातमी आहे. घरगुती गॅस कनेक्शनचे e-KYC पूर्ण करण्यासाठी 16 ऑगस्ट ही अंतिम मुदत देण्यात आली होती, पण आता ही डेडलाईन संपली आहे. जर तुम्हीदेखील शेवटच्या तारखेपर्यंत KYC पूर्ण करू शकला नसाल, तर घाबरून जाऊ नका. तुमच्याकडे नक्की काय पर्याय आहे, सिलेडेंरचे रेट वाढणार का, डिलीव्हरी मिळणं कठीण होणार का ? तुमच्या मनातील प्रत्येक प्रश्नाचं उत्तर इथे जाणून घेऊ शकता.
e-KYC पूर्ण केली नाही तर काय होऊ शकतं ?
इंडेन, भारत गॅस आणि HP गॅसच्या घरगुती ग्राहकांना e-KYC पूर्ण करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे. अंतिम मुदत चुकल्यानंतर KYC प्रलंबित असलेल्या ग्राहकांना घरगुती LPG सिलिंडर मिळताना अडचणी येऊ शकतात. तेल आणि गॅस कंपन्यांकडून पाठवण्यात आलेल्या संदेशानुसार, अंतिम तारखेपर्यंत LPG KYC पूर्ण न करणाऱ्या ग्राहकांना ई-KYC प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत घरगुती दराने सिलिंडर मिळण्यात अडचण येऊ शकते. म्हणजेच, 14.2 किलोच्या घरगुती सिलिंडरसाठी तुम्हाला अधिक किंमत मोजावी लागू शकते.
LPG ई-KYC ची अंतिम मुदत चुकल्यास खिशावर किती अतिरिक्त भार पडेल?
16 ऑगस्टनंतरही ज्यांनी LPG ई-KYC प्रक्रिया पूर्ण न केली नसेल त्या ग्राहकांना KYC पूर्ण होईपर्यंत सिलिंडरसाठी अधिक पैसे द्यावे लागू शकतात. KYC पूर्ण न झाल्यास घरगुती सिलिंडरसाठी व्यावसायिक (कमर्शियल) सिलिंडरच्या दराने पैसे आकारले जाऊ शकतात. उदाहरणार्थ, तुम्ही दिल्लीत राहत असाल आणि तुमची ई-KYC पूर्ण नसेल, तर 14.2 किलोच्या घरगुती सिलिंडरसाठी 942 ऐवजी 19 किलोच्या कमर्शियल सिलिंडरच्या दराने, म्हणजे सुमारे 2,738 रुपयेसे द्यावे लागू शकतात.
KYC न केल्यास LPG कनेक्शन रद्द होईल का?
असं होणार नाही. 16 ऑगस्टपर्यंत ई-KYC पूर्ण न करणाऱ्या ग्राहकांचे LPG कनेक्शन कायमचं रद्द केलं जाणार नाही. BPCL कडून जारी करण्यात आलेल्या नोटीसनुसार, अंतिम मुदत चुकल्यास LPG कनेक्शन तात्पुरते निलंबित केलं जाऊ शकतं. मात्र, KYC पूर्ण केल्यानंतर कनेक्शन पुन्हा सुरू करण्यात येईल.
आता LPG ग्राहकांनी काय करावं?
जर तुम्हाला SMS, ई-मेल किंवा WhatsApp द्वारे तुमची LPG ई-KYC प्रलंबित असल्याची किंवा पूर्ण न झाल्याची सूचना मिळत असेल, तर या मेसेजकडे दुर्लक्ष करू नका. LPG एजन्सीच्या अधिकृत आणि पडताळलेल्या माध्यमातून शक्य तितक्या लवकर KYC पूर्ण करा. तुम्हाला कोणताही संदेश आला नसेल, तरी तुमच्या LPG कनेक्शनची KYC पूर्ण आहे की नाही, हे एकदा तपासून पाहणं योग्य ठरेल.
LPG ची ई-KYC कशी पूर्ण करायची?
LPG ई-KYC पूर्ण करण्यासाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही सुविधा उपलब्ध आहेत.
ऑनलाइन प्रक्रिया: तुम्ही ज्या तेल कंपनीचा गॅस सिलिंडर वापरता, त्या कंपनीचे अधिकृत मोबाइल ॲप डाउनलोड करून ई-KYC पूर्ण करू शकता. इंडेन, भारत गॅस किंवा HP गॅसच्या ॲपद्वारे गॅस कनेक्शन क्रमांक, आधार क्रमांक आणि आधार फेस ऑथेंटिकेशनच्या मदतीने घरबसल्या ई-KYC करता येऊ शकते.
ऑफलाइन प्रक्रिया: तुमच्या LPG वितरकाकडे (डिस्ट्रीब्युटर) जाऊन KYC फॉर्म भरून प्रक्रिया पूर्ण करू शकता.
डिलिव्हरी बॉयमार्फत: LPG सिलिंडरची डिलिव्हरी करणाऱ्या व्यक्तीकडे उपलब्ध असलेल्या बायोमेट्रिक उपकरणाच्या मदतीने घरातूनच ई-KYC पूर्ण करता येऊ शकते.
LPG ई-KYC ची गरज का ?
आखाती युद्ध सुरू झाल्यानंतर भारतातील LPG पुरवठ्याबाबत निर्माण झालेल्या समस्यांच्या पार्श्वभूमीवर योग्य ग्राहकांपर्यंत LPG सिलिंडरचा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी सरकारने ई-KYC अनिवार्य केलं. मार्च 2026 मध्ये सरकारने LPG ग्राहकांच्या पडताळणीसाठी ई-KYC अनिवार्य केलं होतं.
16 ऑगस्टची अंतिम मुदत चुकली तर LPG सब्सिडीचं काय होईल?
LPG सब्सिडीसाठी पात्र असलेल्या ग्राहकांना सब्सिडीचा लाभ मिळण्यासाठी KYC पूर्ण असणे आवश्यक आहे. जर तुमची KYC पूर्ण नसेल, तर तुम्हाला सब्सिडीचा लाभ मिळू शकणार नाही. तसेच सब्सिडीची रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा होणार नाही.