
Income Tax Free Country : भारतासह अनेक देशात करदात्यांना त्यांचा पगार, कमाई आणि इतर उत्पन्नावर कर द्यावा लागतो. सरकारला आयकर भरावा लागतो. पण या देशात एकाही नागरिकाला कर द्यावा लागत नाही. तुमची कमाई छोटी असो वा मोठी असो या देशातील नागरिकांना एक रुपया सुद्धा कर द्यावा लागत नाही. जगात असे कोणते देश आहे, याविषयी लोकांच्या मनात उत्सुकता आहे. जगातील काही निवडक देशातच अशी सुविधा, सवलत आहे. येथील नागरिकांना त्यांच्या कोट्यवधींच्या कमाईवर सरकार दरबारी एक रुपयाही कर म्हणून द्यावा लागत नाही.
मालदीव
मालदीव हा देश पर्यटनावर श्रीमंत झाला आहे. हा देश टॅक्स फ्री म्हणून लोकप्रिय आहे. मालदीवमध्ये लोक पर्यटन आणि आलिशान आयुष्य जगण्यासाठी, सुट्या घालवण्यासाठी जातात. सरकार येथील लोकांच्या एका निश्चित कमाईवर कोणताही कर घेत नाही. पण परदेशी नागरिकांना येथील नागरिकत्व मिळणे एकदम अवघड आहे.
बहरीन
आखाती देश बहरीन टॅक्स फ्री आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत कच्चे तेल विक्री आणि पर्यटनाचा मोलाचा वाटा आहे. येथे उत्पन्नावर कर आकारला जात नाही. या देशाचे नागरिकत्व मिळणे अवघड आहे. परदेशी नागरिकांसाठी 10 वर्षांचा गोल्डन रेसिडेंसी कार्यक्रम येथे राबविण्यात येतो. त्याआधारे परदेशी नागरीक येथे राहु शकतात.
ब्रुनेई
ब्रुनेईमध्ये कोणताही आयकर द्यावा लागत नाही. येथील नागरिकांना सरकार आरोग्य सेवा आणि शिक्षण पूर्णपणे मोफत पुरवते. येथे परदेशी नागरिकांसाठी नागरिकत्व मिळवणे अवघड आहे. त्यासाठी किचकट नियमांचे पालन करावे लागते.
यासह द बहामास, बर्म्युडा, कॅमन आयलँड्स, कुवेत, मोनॅको, ओमान आणि कतार या देशात कोणताही कर द्यावा लागत नाही. तर सरकार नागरिकांना इतर अनेक सोयी-सुविधा पण देतात. भारतासह जगातील अनेक देश त्यांच्या नागरिकांकडून आयकरसह इतरही कर घेतात. भारतात तर वस्तूंवरही कर द्यावा लागतो. दैनंदिन काही खाद्यपदार्थांवरही कर द्यावा लागतो. वाहन खरेदी करतानाही कर द्यावा लागतो.