
सततच्या पावसामुळे कांद्याचे प्रचंड नुकसान झाल्याने कांदा उत्पादक शेतकरी हा आर्थिक अडचणीत सापडला आहे त्यात कांद्याच्या बाजारभावात खूप दररोज चढ-उतार होत असल्याने कांदा उत्पादक शेतकर्यांची डोकेदुखी वाढली आहे अशातच केंद्र सरकारकडून नाफेड एनसीसीएफ मार्फत तीन लाख मॅट्रिक टन कांदा खरेदीची घोषणा करून तीन महिने उलटले अद्यापही कांदा खरेदी ही सुरू न झाल्याने गेल्या दोन वर्षाचा अनुभव पाहता हे खरेदी कागदावरच होणार का अशी शंका शेतकर्यांकडून उपस्थित केली जात आहे. नाफेडची कुंभकर्णी झोप लवकर उघडावी अशी मागणी शेतकरी करत आहेत.
तीन हजार रुपये भाव द्या
लासलगाव (नाशिक) सध्या कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. घोषणा होऊन अद्याप नाफेडची कांदा खरेदी नाही नाफेडला जर कांदा खरेदी करायचा असेल तर तीन हजार रुपये क्विंटलने कांदा खरेदीची मागणी करण्यात येत आहे. नाफेडला कांदा खरेदी करायचा असेल तर तो थेट बाजार समितीतून तीन हजार रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी करावा म्हणजे शेतकऱ्यांना लाभ होईल अशी मागणी कांदा विषयी तज्ञ आणि मुंबई बाजार समिती संचालक जयदत्त होळकर यांनी केली आहे.
शेतकरी सापडला कात्रीत
सध्या कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. तीन महिन्यापूर्वी नाफेड, एनसीसी मार्फत कांदा खरेदी केला जाईल अशी घोषणा करण्यात आली. अद्यापही कांदा खरेदीला कुठल्या बाजार समितीत सुरुवात झाली नाही. आपण जर एकंदरीत बघितले तर शेतकर्यांचा कांदा उत्पादन करण्यासाठी अडीच हजार रुपये क्विंटल खर्च येतो.
सध्याचे दर शेतकऱ्यांना बाराशे ते पंधराशे रुपयांचे दर मिळत आहे. नाफेडला जर कांदा खरेदी करायचा असेल तर तीन हजार रुपये क्विंटलने कांदा खरेदी करावा तरच शेतकर्यांना खऱ्या अर्थाने लाभ होईल, असे शेतकरी आणि नेत्यांचे म्हणणे आहे. मागील दोन वर्षाचा अनुभव बघितला तर नाफेड आणि एनसीसीएफच्या मार्फत खरेदी झाली त्यामध्ये प्रचंड असा घोळ झाला, गोंधळ झाला, भ्रष्टाचार झाला असा आरोप करण्यात आला आहे.
नाफेडच्या अध्यक्षांनी पण या व्यवस्थेवर बोट ठेवले होते. मग तरीही त्याच पद्धतीची खरेदी यावर्षी सुरू आहेत का? अशा शंका शेतकऱ्यांच्या मनामध्ये निर्माण होत आहे. त्यामुळे कांदा खरेदीत पारदर्शकता आणणे गरजेचे आहे, असे शेतकऱ्यांचे मत आहे. त्यामुळे बाजार समितीमध्ये हा कांदा खरेदी केला. काय दराने खरेदी केला. किती खरेदी केला व कोणत्या शेतकर्याकडून खरेदी केला हे स्पष्ट होईल. म्हणून नाफेड, एनसीसीएफ जी काही कांदा खरेदी करायची असेल ती कांदा खरेदी बाजार समितीमध्ये येऊ खरेदी करावा म्हणजे शेतकर्यांना लाभ होईल, असे कांदा विषयी तज्ज्ञ मत मांडत आहेत.