
EPFO Pension Rules : सेवा निवृत्ती योजना ही देशातील लाखो लोकांसाठी निवृत्तीनंतर आर्थिक आधार आहे. पण काही पेन्शनधारक, निवृत्ती वेतनधारक बँकेत जमा होणारी पेन्शनची रक्कम काढत नाहीत. त्यांचा पैसा बँक खात्यात तसाच पडून राहतो. ही रक्कम तशीच पडून असते. मग ही रक्कम सरकार परत घेते का? असा प्रश्न अनेकांच्या मनात येतो. काय आहे त्यामागील सत्य? काय सांगतो नियम?
पेन्शनची रक्कम नाही काढली तर काय होते?
साधारणपणे तुमच्या खात्यात जमा झालेली पेन्शनची रक्कम सरकार थेट परत घेत नाही. पण काही खास परिस्थितीत आणि योजनांमध्ये हा नियम लागू होऊ शकतो. या नियमांमुळे पेन्शन प्रभावित होऊ शकते. जर तुम्ही 6 महिन्यांपर्यंत पेन्शन काढत नसाल तर सरकार असे खाते संशयास्पद मानते. कारण जर त्या खात्यात कोणताच व्यवहार दिसत नसेल तर मग ही पेन्शनची रक्कम योग्य व्यक्तीच्या हातात जात आहे की नाही याविषयी शंका उपस्थित होते. त्यामुळे सेवा निवृत्ती धारकांनी कोणत्याही कागदी कारवाईला सामोरे जाण्यापेक्षा खात्यात व्यवहार करावा आणि जीवन प्रमाणपत्र जमा करण्याचा सल्ला देण्यात येतो. त्यासाठी बँक खाते नेहमी सक्रीय ठेवा. KYC अपडेट करा. जर पेन्शन थांबविण्यात आली असेल तर लागलीच ईपीएफओ अथवा बँकेशी संपर्क साधा.
या गोष्टीकडे लक्ष द्या
जर दीर्घकाळपर्यंत पेन्शन खात्यातून कोणताही व्यवहार झाला नसेल. त्यातून रक्कम काढण्यात आली नसेल तर सरकार त्या व्यक्तीला मृत समजून पेन्शनची रक्कम थांबवते. पण याचा अर्थ सरकार बँकेतील रक्कम परत घेते असा होत नाही. बँकेतील रक्कम तशीच सुरक्षीत राहते. पण काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. त्यानंतर पेन्शन मिळण्याचा मार्ग मोकळा होतो. जीवन प्रमाण पत्र सादर न करणे अथवा बँक खाते निष्क्रिय असणे यामुळेच पेन्शन थांबविण्यात येते. अशावेळी पेन्शनधारकांनी लागलीच संबंधित संस्थांशी संपर्क करणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया ऑनलाईन आणि ऑफलाईन अशी पूर्ण करता येते.
काय सांगतो नियम?
पेन्शन पुन्हा सुरु करण्यासाठी पेन्शनधारकांना स्वतः बँक अथवा पेन्शन कार्यालयात जाऊन जीवंत असल्याचा पुरावा सादर करावा लागतो. त्यांचे जीवन प्रमाणपत्र जमा करावे लागते. एक लिखित अर्ज करुन इतक्या दिवस पेन्शन खात्यातील रक्कम का काढली नाही. त्यामागील कारण काय, हे खाते निष्क्रिय का होते याची माहिती द्यावी लागते आणि पुन्हा पेन्शन सुरु करण्याची विनंती करावी लागते. कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर आणि योग्य प्रक्रिया पूर्ण झाल्यानवर पेन्शन पुन्हा सुरु होते.