Fuel Price : पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार, कच्च्या तेलाचे भाव कोसळणार, मोठी अपडेट समोर

Fuel Price Cut : देशातील इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. मात्र आता सर्व काही सुरळीत राहिले तर आगामी काळात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घट होण्याची शक्यता आहे.

Fuel Price : पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार, कच्च्या तेलाचे भाव कोसळणार, मोठी अपडेट समोर
India Fuel price big update
Image Credit source: Google
| Updated on: Aug 18, 2026 | 11:01 PM

मध्य पूर्वेतील तणावामुळे जागतिक तेल बाजारात खळबळ उडालेली आहे. भारतालाही याचा फटका बसला असून देशातील इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. मात्र आता सर्व काही सुरळीत राहिले तर आगामी काळात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घट होण्याची शक्यता आहे. स्वित्झर्लंडमधील प्रमुख वेल्थ मॅनेजमेंट कंपनी ज्युलियस बेअरचे व्यवस्थापकीय संचालक मार्क मॅथ्यूज यांनी आगामी काळात कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल सुमारे 60 डॉलरपर्यंत घसरू शकतात, असा अंदाज व्यक्त केला आहे. आनंद राठी फायनान्शियल सर्व्हिसेसचे कार्यकारी संचालक आणि मुख्य अर्थतज्ज्ञ सुजन हजरा यांनीही याला समर्थन दिले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

कच्च्या तेलाचे दर का घसरू शकतात?

तज्ज्ञांच्या मते, जागतिक तेल बाजारात मोठ्या प्रमाणात अतिरिक्त पुरवठा उपलब्ध आहे. आखाती देशांमधील तेल उत्पादकांकडे, विशेषतः सौदी अरेबिया, इराक आणि कुवेतकडे मोठी अतिरिक्त उत्पादन क्षमता आहे. ही क्षमता पुन्हा बाजारात आणली जाऊ शकते. त्याचबरोबर भू-राजकीय परिस्थिती सामान्य झाल्यास इराण आणि रशियामधील सध्या बाजाराबाहेर असलेला तेलाचा पुरवठाही पुन्हा उपलब्ध होऊ शकतो.

पश्चिम आशियातील तणाव कमी झाला आणि आंतरराष्ट्रीय शिपिंग मार्ग सुरळीत झाले, तर कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण होण्याची शक्यता आहे. मात्र, कच्च्या तेलाच्या किमती दीर्घकाळ 60 डॉलरच्या आसपास राहिल्यास OPEC+ देश उत्पादन कमी करू शकतात. तसेच जास्त उत्पादन खर्च असलेल्या तेल उत्पादक कंपन्या गुंतवणूक कमी करू शकतात. त्यामुळे बाजारातील पुरवठा मर्यादित होऊन भविष्यात तेलाच्या किमती पुन्हा वाढण्याची शक्यता निर्माण होऊ शकते.

आंतरराष्ट्रीय अभ्यासकांनी म्हटले की, तेलाच्या बाजाराचा अचूक अंदाज बांधणे कठीण आहे. एखाद्या आर्थिक किंवा भू-राजकीय घटनेचा तेलाच्या बाजारावर होणारा परिणाम त्या वेळची तेलाची उपलब्धता, बाजारातील गुंतवणूकदारांची स्थिती, अतिरिक्त उत्पादन क्षमता आणि बाजारातील मागणी यावर अवलंबून असते.

कच्चे तेल स्वस्त झाले तर सामान्यांना फायदा होणार?

कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्यास भारतातील सामान्य नागरिकांना फायदा होऊ शकतो. मात्र, कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली घट पेट्रोल पंपावरील दरात तात्काळ दिसेलच असे नाही. सुजन हजरा यांच्या मते, कच्च्या तेलाच्या एका बॅरलपासून पेट्रोल किंवा डिझेल तयार होऊन ते ग्राहकांपर्यंत पोहोचेपर्यंतच्या प्रक्रियेत अनेक खर्चांचा समावेश असतो. त्यामुळे इंधनाचे दर काही प्रमाणात कमी होऊ शकतात.

भारताला मोठा फायदा होऊ शकतो

भारत आपल्या एकूण गरजेपैकी मोठ्या प्रमाणात कच्चे तेल आयात करतो. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्यास भारताला मोठा आर्थिक फायदा होऊ शकतो. देशाच्या आयात बिलावरील आणि चालू खात्यावरील दबाव कमी होऊ शकतो. तसेच थेट अर्थव्यवस्थेवरही याचा सकारात्मक परिणाम होऊ शकतो.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us