सामान्य जनतेचं कंबरडं मोडणार, एक-दोन नव्हे तब्बल इतक्या रुपयांनी पेट्रोल-डिझेल महागणार; अहवालाने खळबळ

Fuel Price : इंधनाच्या दरात अवघ्या 4 दिवसात दोन वेळा वाढ करण्यात आली असून, आता आगामी काळात इंधनाच्या किमतीत आणखी मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

सामान्य जनतेचं कंबरडं मोडणार, एक-दोन नव्हे तब्बल इतक्या रुपयांनी पेट्रोल-डिझेल महागणार; अहवालाने खळबळ
Fuel Price News
Image Credit source: Google
| Updated on: May 19, 2026 | 7:23 PM

इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धामुळे कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. या वाढीचा परिणाम आता भारतातील पेट्रोल-डिझेलच्या किमतींवरही दिसू लागला आहे. इंधनाच्या दरात अवघ्या 4 दिवसात दोन वेळा वाढ करण्यात आली असून, 15 मे रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 3 रुपयांची वाढ करण्यात आली होती. त्यानंतर 19 मे रोजी पुन्हा 90 पैशांची वाढ करण्यात आली. मात्र, तज्ज्ञांच्या मते ही वाढ अपुरी असून सरकारी तेल कंपन्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी इंधन दरात आणखी मोठी वाढ करावी लागू शकते. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

तब्बल इतक्या रुपयांनी इंधन महागणार

कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीज या ब्रोकरेज फर्मच्या अहवालानुसार, सध्याच्या परिस्थितीत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 13 ते 17 रुपयांपर्यंत अतिरिक्त वाढ होण्याची गरज आहे. कच्च्या तेलाच्या उच्च किमती आणि पश्चिम आशियातील तणावामुळे भारतावर आर्थिक दबाव वाढत आहे. फक्त सध्याची दरवाढ किंवा सोने आयात शुल्क वाढवण्यासारखे उपाय पुरेसे नसून, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अधिक कठोर आर्थिक पावले उचलावी लागू शकतात असंही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

तेल कंपन्या तोट्यात

कोटकच्या अहवालात असेही नमूद करण्यात आले आहे की, सध्याच्या दरवाढीनंतरही सरकारी तेल कंपन्यांना मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागत आहे. कमी वसुलीमुळे तेल कंपन्यांना दरमहा सुमारे 25 हजार कोटी रुपयांचे नुकसान होत असल्याचा अंदाज आहे. डिझेलवरील अंडर-रिकव्हरी सुमारे 11.40 रुपये प्रतिलिटर तर पेट्रोलवरील अंडर-रिकव्हरी 14.30 रुपये प्रतिलिटर इतकी असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे हे नुकसान भरून काढण्यासाठी इंधन दरात आणखी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

टप्प्याटप्प्याने दर वाढवले जाणार

इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, ग्राहकांवर अचानक मोठा आर्थिक भार पडू नये आणि महागाई नियंत्रणात राहावी यासाठी इंधन दर टप्प्याटप्प्याने वाढवले जात आहेत. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या संयुक्त सचिव सुजाता शर्मा यांनीही यापूर्वी सांगितले होते की, तेल कंपन्यांना दररोज सुमारे 750 कोटी रुपयांचे नुकसान होत आहे. 15 मे रोजी झालेल्या दरवाढीनंतर या नुकसानीत काही प्रमाणात घट झाली असली तरी आगामी काळात इंधनाच्या किमती आणखी वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे आगामी काळात सामान्य जनतेचे महागाईमुळे कंबरडे मोडण्याची शक्यता आहे.

 

Follow Us