
बॉलिवूडची अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती आणि प्रसिद्ध उद्योगपती राज कुंद्रा हे गेल्या काही काळापासून संकटात आहेत. या दोघांच्या कायदेशीर आणि आर्थिक अडचणी काही केल्या कमी होताना दिसत नाहीत. एकेकाळी हे दोघे आपल्या व्यवसायामुळे आणि आलिशान जीवनशैलीमुळे चर्चेत असायचे. मात्र हे जोडपं आता गंभीर वादांना आणि तपास यंत्रणांच्या प्रश्नांना तोंड देताना दिसत आहे. यामुळे आता या जोडप्याच्या आर्थिक मालमत्तेत मोठी घट झाली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
ई़डीने एप्रिल 2024 मध्ये उद्योगपती राज कुंद्राची सुमारे 97.79 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती. यात शिल्पा शेट्टीचा जुहू येथील फ्लॅट, पुण्यातील बंगला आणि राज कुंद्राच्या इक्विटी शेअर्सचा समावेश होता. 6600 कोटी रुपयांच्या बिटकॉइन पोंझी घोटाळ्याच्या प्रकरणात ही कारवाई करण्यात आली होती. राज कुंद्राला 285 बिटकॉईन मिळाले होते असा आरोप होता. याची सध्याची किंमत 150 कोटी रुपये जास्त आहे.
सप्टेंबर 2025 मध्ये राज आणि शिल्पा या जोडप्याला आणखी एक धक्का बसला होता. मुंबई पोलिसांनी बंद पडलेली कंपनी बेस्ट डील टीव्ही प्रायव्हेट लिमिटेडशी संबंधित 60 कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या प्रकरणात दोघांना लूकआउट नोटीस जारी केली आहे. उद्योगपती दीपक कोठारी यांनी आरोप केला आहे, शिल्पा शेट्टीने 2016 मध्ये राजीनामा दिला होता, त्यामुळे मला मोठे नुकसान झाले आहे.
त्यानंतर आता शिल्पा शेट्टीने आपले प्रसिद्ध रेस्टॉरंट बास्टियन वांद्रे बंद करण्याची घोषणा केली. स्थलांतर करण्यासाठी आणि त्याची नव्याने बांधणी करण्यासाठी रेस्टॉरंट बंद करत असल्याचे शिल्पाने म्हटले आहे, मात्र 60 कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या प्रकरणात नोटीस मिळाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे यामागे वेगळेच कारण असल्याचे बोलले जात आहे. मार्च 2024 मध्ये या ब्रँडने 127 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवले होते अशी माहितीही समोर आली होती. मात्र आता हे रेस्टॉरंट बंद करण्यात आले आहे.
शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला 2021 मध्ये पोर्नोग्राफी प्रकरणात अटक करण्यात आली होती. तसेच 203 मध्ये आयपीएल सट्टेबाजी घोटाळ्यामुळे राजस्थान रॉयल्समधून बाहेर पडावे लागले होते. काही काळापूर्वी राज कुंद्राची एकूण संपत्ती सुमारे 2800 कोटी रुपये होती, तसेच शिल्पाची संपत्ती 134 ते 150 कोटी रुपये होती. मात्र आता गेल्या काही काळापासून या दोघांच्या संपत्तीत घट होत असल्याचे दिसत आहे.