Rupees In Global Trade| आता परदेशातही रुपयाचा डंका! कलदार खणखणीत वाजणार, व्यापारासोबत रोखीतही करा व्यवहार

| Updated on: Jul 13, 2022 | 2:53 PM

Rupees In International Trade News : ज्याम भारी बातमी आहे भावांनो, आता परदेशात व्यवहारासाठी प्रत्येकवेळी डॉलरची गरज राहणार नाही. थेट भारतीय कलदार म्हणजे रुपयाचं नाणं खणखणीत वाजणार आहे.

Rupees In Global Trade| आता परदेशातही रुपयाचा डंका! कलदार खणखणीत वाजणार, व्यापारासोबत रोखीतही करा व्यवहार
भारतीय कलदार खणखणार
Image Credit source: TV9marathi
Follow us on

Rupees in Global Trade Payment News : आता भारतीय कलदार अर्थात रुपया (Indian Rupees) विदेशात टणटणात करेल. परदेशात व्यापार वा व्यवहारासाठी (Trade and Transaction) प्रत्येक वेळी डॉलरची गरज राहणार नाही. तुम्ही परदेशात व्यापार आणि व्यवहार करण्यासाठी रुपया वापरु शकाल. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) याविषयीचा निर्णय घेतला आहे. भारतीय केंद्रीय बँकेने आंतरराष्ट्रीय व्यापार सेटलमेंटसाठी(Settlement) भारतीय रुपयाचा वापर करण्यास परवानगी दिली आहे. आरबीआयने म्हटले आहे की, जागतिक स्तरावर होणारा प्रत्येक व्यवहार अथवा पेमेंट हे भारतीय रुपयात सेटल केले जाऊ शकते. जर निर्यातीत भारतीय रुपयाचा वापर वाढला तर जागतिक व्यापारात रुपयाला चालना मिळेल. जागतिक पातळीवर रुपया वधरेल आणि चलन निर्देशांकातही (Currency Index) भारतीय रुपयाला वाव मिळेल. आपणच रुपयाचा वापर वाढवल्यास आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतीय रुपया मजबूत होईल.

प्रत्येक व्यवहार करा रुपयात

भारतीय केंद्रीय बँकेच्या या निर्णयामुळे आता रुपयाही डॉलरच्या स्पर्धेत उभा ठाकणार आहे. डॉलर मजबूत असला तरी अनेक असे देश आहेत जिथे व्यापारासाठी डॉलर निषिद्ध आहे. त्यामुळे अशा ठिकाणी भारतीय कलदार खणखणीत वाजेल. भारतीय रिझर्व्ह बँकेने आंतरराष्ट्रीय व्यापार सेटलमेंटसाठी भारतीय रुपयाचा वापर करण्यास परवानगी दिली आहे. आरबीआयने म्हटले आहे की जागतिक स्तरावर होणारा प्रत्येक व्यवसाय भारतीय रुपयात सेटल केला जाऊ शकतो.

हे सुद्धा वाचा

व्यापार करणे सोपे

भारतीय रुपयांमध्ये व्यापार सेटलमेंटच्या सुविधेमुळे, भारताला आता त्या देशांशी किंवा कंपन्यांशी व्यापार करणे सोपे होईल, जे डॉलरमध्ये व्यवहार करण्यास इच्छुक नव्हते. यामध्ये रशिया आणि युक्रेन युद्धानंतर, अमेरिकेने पूर्वेकडील अनेक देशांना रशियाशी डॉलरमध्ये व्यापार करण्यावर बंदी घातली होती, अशा देशांना व्यापार करण्यासाठी रुपयाचा पर्याय उपलब्ध झाला आहे. तसेच भारतीयांनाही या देशांशी आणखी एक चलनाचा मार्ग खूला झाला आहे. या पर्यायामुळे अशा देशांशी व्यापार करणे सोपे होईल.

अतिरिक्त व्यवस्था करण्याच्या सूचना

भारतीय रिझव्‍‌र्ह बँकेने (RBI) सोमवारी बँकांना भारतीय चलनात आयात आणि निर्यातीसाठी अतिरिक्त व्यवस्था करण्याचे निर्देश दिले आहेत. रिझर्व्ह बँकेने एका परिपत्रकात म्हटले आहे की, ही प्रणाली लागू करण्यापूर्वी बँकांना त्यांच्या परकीय चलन विभागाची पूर्वपरवानगी घेणे गरजेचे आहे. भारतातील निर्यात वाढवण्यासाठी तसेच भारतीय रुपयात जागतिक व्यापार समुदायाची आवड लक्षात घेत हा निर्णय घेण्यात आल्याच आरबीआयने स्पष्ट केले आहे. बिल निर्मिती, पेमेंट आणि रुपयात आयात/ निर्यातीसाठी, त्यातच व्यवहार सेटलमेंट (Settlement News) करण्यासाठी प्रत्येक बँकेने अतिरिक्त व्यवस्था उभारण्याचे निर्देश बँकेने दिले आहेत .

अशी होईल प्रक्रिया

व्यापार सौदे करण्यसााठी संबंधित बँकांना भागीदार व्यापार देशाच्या एजंट बँकेच्या विशेष रुपी व्होस्ट्रो खात्यांची आवश्यकता असेल. या व्यवस्थेद्वारे, भारतीय आयातदारांना विदेशी विक्रेता किंवा पुरवठादाराकडून वस्तू किंवा सेवांच्या पुरवठ्यासाठी बिलाच्या विरोधात भारतीय रुपयांमध्ये पैसे द्यावे लागतील, जे एजंट बँकेच्या विशेष व्होस्ट्रो खात्यात जमा केले जातील. तसेच निर्यातदार परदेशी बँकांतून भारतीय रुपयात पेमेंट स्वीकारु शकतील. या व्यवस्थेमुळे भारतीय निर्यातदार विदेशी आयातदारांकडून रूपयांमध्ये आगाऊ रक्कमही घेऊ शकतील.