
फेब्रुवारी महिन्यात ऑटो सेक्टरला (auto sector) मोठा फटका बसला आहे. सेमीकंडक्टरच्या (Semiconductor) शॉर्टेजमुळे देशांतर्गंत प्रवासी वाहनाच्या विक्रीत तब्बल आठ टक्क्यांची घट झाली. ऑटोमोबाईल डिलर असोसीएशनच्या (FADA) मते गेल्या फेब्रुवारी महिन्यात देशभरात एकूण 258337 इतक्या प्रवासी वाहनांची विक्री झाली. प्रवाशी वाहनाच्या विक्रीमध्ये फेब्रुवारी महिन्यात वार्षिक आधारावर 9.21 टक्क्यांची घट झाली आहे. फेब्रुवारी 2020 च्या तुलनेत फेब्रुवारी 2022 मध्ये वाहन विक्रीत तब्बल 20.65 टक्क्यांची घट झाली आहे. परंतु जरी असे असले तरी देखील फेब्रुवारी महिन्यात प्रवासी रिक्षांच्या विक्रीमध्ये मात्र तेजी दिसून आली. गेल्या महिन्यात रिक्षाच्या विक्रीमध्ये वार्षिक आधारावर 16.64 टक्क्यांची वाढ झाली आहे. तर दुसरीकडे दुचाकींच्या विक्रीत 10.67 टक्क्यांची आणि टॅक्टरच्या विक्रीमध्ये 18.87 टक्यांची घट नोंदवण्यात आली.
देशात आधीच सेमीकंडक्टरचा तुटवडा आहे आणि आता त्यात भरीस भर म्हणून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू झाले आहे. या युद्धाचा मोठा फटका हा सेमीकंडक्टरच्या पुरवठ्यावर होताना दिसत आहे. युद्ध आणखी काही दिवस चालू राहिल्यास परिस्थिती गंभीर बनेल. सेमीकंडक्टर चीप वेळेत उपलब्ध होत नसल्याने वाहन निर्मितीमध्ये घट झाली आहे. वाहनांची निर्मिती कमी असल्याने त्याचा विक्रीवर परिणाम झाला. तसेच वाढत असलेले कच्च्या तेलाचे भाव पाहाता येणाऱ्या काळात पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे देखील ग्राहक सध्या वाहन खरेदी करणे टाळत असल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले.
याबाबत बोलताना फाडाचे अध्यक्ष विंकेश गुलाटी यांनी म्हटले आहे की, जोपर्यंत रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू राहिल तोपर्यंत ऑटो सेक्टरवरील संकटे कायम राहणार आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे रशिया हा वाहनांसाठी लागणाऱ्या सेमीकंडक्टर चीपचा मोठा उत्पादक देश आहे. आपल्याला सेमीकंडक्टरचा मोठ्याप्रमाणात पुरवठा हा रिशायामधून होतो. मात्र सध्या रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत रशियाकडून सेमीकंडक्टरचा पुरवठा होणे शक्य नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात वाहन निर्मितीला मोठा फटका बसू शकतो.
Russia Ukraine War : सोन्या-चांदीच्या दरात आज पुन्हा वाढ, सोने गेल्या 14 महिन्यातील सर्वोच्च स्तरावर