SEBI Supreme Court : शेअर बाजारात लवकरच सर्जिकल स्ट्राईक! शॉर्ट सेलिंग बंद होणार? सेबीने सर्वोच्च न्यायालयात काय मांडली बाजू

| Updated on: Feb 14, 2023 | 8:20 PM

SEBI Supreme Court : शेअर बाजारात लवकरच सर्जिकल स्ट्राईक होण्याची शक्यता आहे. सेबीने याविषयीची भूमिका सर्वोच्च न्यायालयासमोर मांडली. सेबी शेअर बाजारातील घडामोडींवर नजर ठेऊन असल्याचे प्रतिपादन करण्यात आले आहे.

SEBI Supreme Court : शेअर बाजारात लवकरच सर्जिकल स्ट्राईक! शॉर्ट सेलिंग बंद होणार? सेबीने सर्वोच्च न्यायालयात काय मांडली बाजू
काय होणार?
Follow us on

नवी दिल्ली : भारतीय प्रतिभूति आणि विनिमय मंडळाने (SEBI) शेअर बाजारातील अनियमिततेविषयीची भूमिका सर्वोच्च न्यायालयासमोर मांडली. त्यामुळे येत्या काही दिवसांत शेअर बाजारात लवकरच सर्जिकल स्ट्राईक होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. शेअर बाजारात नियम धाब्यावर बसून सर्वसामान्यांच्या गुंतवणुकीवर ताव मारणाऱ्यांचा लवकरच हिशेब होण्याची शक्यता आहे. हिंडनबर्ग संस्थेच्या (Hindenburg Report) अहवालात अदानी समूहावर (Adani Group) लावलेल्या आरोपांची चौकशी करण्यात येत आहे. तसेच अदानी समूहाच्या शेअरच्या किंमतीत सातत्याने चढउतार होत असल्याचाही तपास करण्यात येणार आहे. सेबीने सुप्रीम कोर्टात 20 पानी शपथपत्र सादर केले आहे. अदानी समूहाच्या शेअरमध्ये घसरणीनंतर सर्वोच्च न्यायालयात (Supreme court) दोन जनहित याचिका (PIL) दाखल करण्यात आल्या आहेत. त्याच्यावर सोमवारी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या पीठासमोर सुनावणी झाली. सेबीने न्यायपालिकेसमोर लिखित उत्तर दाखल केले. त्यात शॉर्ट सेलिंग काय आहे आणि हिंडनबर्ग अहवालाविषयीचा ऊहापोह करण्यात आला आहे.

सेबीने शेअर बाजारात शॉर्ट सेलिंग बंद करण्याचा कोणताही विचार नसल्याचे प्रतिपादन केले. नियमांच्या अनुषंगाने शॉर्ट सेलिंगचे उल्लंघन झाल्याप्रकरणात चौकशी करण्यात येत असल्याचे सेबीने स्पष्ट केले. हिंडनबर्ग अहवालापूर्वी आणि त्यानंतर बाजारातील घडामोडींचा आढावा घेण्यात येणार आहे. त्याची चौकशी करण्यात येणार आहे. अशी परिस्थिती हातळण्यासाठी बाजाराकडे मोठी यंत्रणा असल्याचा दावा सेबीने केला आहे. तसेच निष्पक्षरित्या ही चौकशी करण्यात येणार आहे.

हिंडनबर्ग रिसर्चच्या आरोपानंतर अदानी समूहात भयकंप आला होता. अदानी समूहाने मात्र हे आरोप फेटाळले आहेत. हिंडनबर्ग रिपोर्ट सार्वजनिक झाल्यानंतर, अदानी समूहाच्या भांडवलात 120 अब्ज डॉलरपेक्षा मोठी घसरण झाली आहे. सेबीने दावा केला आहे की, अदानी समूहाच्या शेअरच्या घसरणीचा कुठलाही परिणाम शेअर बाजारावर झाला नाही.

हे सुद्धा वाचा

भारतीय शेअर बाजारात यापूर्वीही मोठे संकट आले आहेत. बाजारात मोठ्या प्रमाणावर अस्थिरता यापूर्वी आली होती. कोरोना काळात 2 मार्च 2020 ते 19 मार्च 2020, या 13 दिवसांच्या व्यापारी सत्रात निफ्टीत जवळपास 26 टक्क्यांची घसरण झाली. बाजाराने ही अस्थिरता घालविण्यासाठी काही बदलही केले होते, अशी माहिती सर्वोच्च न्यायालयाला देण्यात आली.

अदानी समूहाला फ्रांसच्या टोटल एनर्जीज या कंपनीने मोठा झटका दिला आहे. अदानी समूहात या विदेशी गुंतवणूकदाराने मोठ्या गुंतवणुकीची तयारी केली होती. हायड्रोजन प्रोजेक्टसाठी अदानी समूहासोबत 50 अब्ज डॉलरचा प्रस्ताव कंपनीने राखीव ठेवला आहे.

बिझनेस स्टँडर्डने रायटर्सच्या आधारे याविषयीचे वृत्त दिल आहे. त्यानुसार हिंडनबर्ग रिपोर्टनंतर अदानी समूहाचा लेखा परिक्षण अहवाल येईपर्यंत हा करार पुढे सरकणार नाही. या आरोपींची शहानिशा झाल्याशिवाय कंपनी अदानी समूहाशी पुढील बोलणी करणार नाही.