‘टेस्ला’ ला भारतात सध्या मुहुर्त नाहीच; EV वरील आयात शुल्कावरुन बोलणी फिस्कटली

| Updated on: May 14, 2022 | 10:10 AM

टेस्ला ला भारतीय बाजारात नशीब आजमावयचे आहे. पंरतू, आयात शुल्क कमी करण्याची कंपनीची मागणी आहे, तर भारत सरकारने शुल्क कपातीऐवजी टेस्लाला भारतातच उत्पादन सुरु करण्याचा प्रस्ताव दिला आहे. याविषयीची बोलणी फिस्कटल्याने भारतात शो-रुम सुरु करण्यासाठीचे प्रयत्न कंपनीने थांबविले आहे.

टेस्ला ला भारतात सध्या मुहुर्त नाहीच; EV वरील आयात शुल्कावरुन बोलणी फिस्कटली
ई-वाहने (प्रातिनिधिक छायाचित्र)
Image Credit source: tv9
Follow us on

मुंबई : बोलणी फिस्कटल्याने टेस्लाने (Tesla) भारतात पदार्पण करण्याची आपली योजना सध्या लांबणीवर टाकली आहे. आयात शुल्क कमी व्हावे यासाठी कंपनी प्रयत्न करत होती. आयात शुल्क (Import Duty) कमी करण्याची कंपनीची मागणी आहे, तर भारत सरकारने शुल्क कपातीऐवजी टेस्लाला भारतातच उत्पादन सुरु करण्याचा प्रस्ताव दिला आहे. याविषयीची बोलणी फिस्कटल्याने भारतात शो-रुम (Showroom) सुरु करण्यासाठीचे प्रयत्न कंपनीने थांबविल्याची माहिती रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिले आहे. भारत सरकार देशात इलेक्ट्रिक व्हेईकलच्या उत्पादनावर (Electric Vehicle Production) भर देत आहे. तर टेस्ला भारतात पहिल्या टप्प्यात त्यांच्या आयात केलेल्या कारची विक्री करु इच्छित आहे आणि त्यावर आयात शुल्क कमी करण्याची विनंती कंपनीने केली आहे. यापूर्वी टेस्लाचे मालक एलॉन मस्क (Elon Musk) यांनी अनेक कार्यक्रमात भारताच्या आयात शुल्क इतर देशांपेक्षा जास्त असल्याचे मतप्रदर्शित केले होते. त्यावर भारत सरकारने मस्क यांना मार्मिक उत्तर दिले होते, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी , ईवी कारचे उत्पादन चीनमध्ये आणि विक्री भारतात, असे करता येणार नाही असा मार्मिक टोला मस्क यांना लगावला होता.

परदेशातून कारची आयात

टेस्ला अनेक दिवसांपासून भारतात त्यांच्या कार विक्रीची योजना आखून आहे. सुरुवातीच्या टप्प्यात कंपनी भारतात शो-रुम सुरु करुन आयात केलेल्या कारची विक्री करण्याची योजना आखत आहे. त्यानुसार अमेरिका अथवा चीनमधून कार आयात करण्याची योजना आहे. या योजनेसाठी भारत सरकारने आयात शुल्क कमी करावे अशी अपेक्षा कंपनीची होती. त्यासाठी कंपनीने प्रयत्न केले होते. तर दुसरीकडे भारतातच कार उत्पादन करण्यात यावे, यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. त्यामुळे आयात शुल्क कमी करण्याच्या मागणीऐवजी भारतातच उत्पादन सुरु करण्याचा प्रस्ताव सरकारने टेस्लाला दिला. अनेक दिवसांपासून टेस्ला यासाठी प्रयत्नरत होती. भारतात प्रवेशासाठी कंपनीने फेब्रुवारी महिना निश्चित केला होता. भारताच्या अर्थसंकल्पात याविषयीची अनुकूल घटना घडू शकते असा अंदाज कंपनीचा होता. परंतू कंपनीला त्यातून फायदा झाला नाही. परिणामी कंपनीने भारतात पदार्पण करण्याचा निर्णय टाळला. सूत्रांच्या माहितीनुसार, कंपनी देशात शो-रुम आणि विक्रीसंदर्भातील मालमत्ता शोधण्याचा प्रयत्न करत होती, ते थांबविण्यात आले आहे. देशातील कंपनीच्या सदस्यांना दुसरी जबाबदारी देण्यात आली आहे. जानेवारी महिन्यातच एलॉन मस्क यांनी सरकारसोबत चर्चा सुरु असल्याची माहिती दिली होती.

हे सुद्धा वाचा

भारतात इलेक्ट्रीक व्हेईकलचे वारे

केंद्रीय भूपृष्ठ मंत्री नितीन गडकरी यांनी यापूर्वीच सांगितले आहे की, इलेक्ट्रीक व्हेईकलचे उत्पादन वाढणार आहे. भारतात या गाड्यांची संख्या 40 लाखांच्या घरात जाणार आहे. तर येत्या 3 वर्षात ही संख्या 3 कोटींच्या घरात जाण्याची शक्यता आहे. भारतात ईलेक्ट्रिक गाड्यांची संख्या हळूहळू वाढत आहे. सध्या इलेक्ट्रीक व्हेईकल मार्केटवर टाटा मोटर्सचे वर्चस्व आहे. मार्चच्या तिमाहीत कंपनीने 9 हजाराहून अधिक गाड्यांची विक्री केली आहे.