UPI चा जगभरात डंका! आता कतार देशात करा पेमेंट; काय म्हणाले पीयूष गोयल
UPI Expands in Qatar : भारतीय युपीआय सेवा जगभरात डंका वाजत आहे. सिंगापूरसह काही पूर्वोत्तर आशिया देशात सेवा दिल्यानंतर आता आखाती देशांमध्ये पण युपीआय सेवा सुरू झाली आहे. कतारमध्ये युपीआयची सेवाचा श्रीगणेशा झाला.

भारताच्या युनिफाईड पेमेंट्स इंटरेफ म्हणजे युपीआयचा (UPI Payment) डंका जगभरात वाजत आहे. आता ही सेवा सुरू करणाऱ्या देशात कतारचा पण नंबर लागला आहे. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल (Piyush Goyal) यांनी राजधानी दोहा येथील लूलू मॉलमध्ये युपीआय सिस्टिम लाँच केली. म्हणजे या मॉलमध्ये वस्तू खरेदी केल्यानंतर ग्राहकांना क्यूआर कोडच्या माध्यमातून सहज पेमेंट करता येणार आहे. युपीआय हे केवळ डिजिटल पेमेंट पद्धत नाही तर भारतीय कल्पकता आणि तंत्रज्ञानाचे प्रतिक असल्याचे गोयल उद्धघाटनावेळी म्हणाले.
भारत-कतारमधील मैत्रीचे प्रतिक
दोन दिवसांच्या कतार दौऱ्या दरम्यान केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी युपीआय सेवेचे उद्धघाटन केले. त्यांनी कतारमध्ये युपीआय पेमेंट भारताच्या तंत्रज्ञान आणि दोन्ही देशांतील वाढत्या व्यापारी आणि व्यावसायिक धोरणाचे प्रतिक असल्याचे गोयल म्हणाले. हे दोन्ही देशातील विश्वासाचे प्रतिक असल्याचे ते म्हणाले. युपीआयची सेवा जगभरात वाढत असल्याचे ते म्हणाले. भारतात 85 टक्के डिजिटल पेमेंट युपीआयमार्फत होत असल्याचे ते म्हणाले. तर जगभरात जवळपास 50 टक्के डिजिटल पेमेंटमध्ये युपीआयचा वापर होत असल्याचा दावा त्यांनी केला.
Delighted to launch #UPI at the Lulu Mall in Doha symbolising trust across borders. 🇮🇳🇶🇦 pic.twitter.com/3XU5V5kfp8
— Piyush Goyal (@PiyushGoyal) October 6, 2025
कतार नॅशनल बँकेने राष्ट्रीय देयके महामंडळासोबत(NPCI) या सेवेसाठी करार केला आहे. त्याआधारे कतारमधील व्यावसायिक, व्यापाऱ्यांना पॉईंट ऑफ सेल टर्मिनलवर QR कोड आधारीत युपीआय पेमेंट सेवा सुरू करण्यात आली आहे. कतारमधील लूलू या मॉलमध्ये आता भारतीय पेमेंट सिस्टिमद्वारे व्यवहार करणे अगदी सोपे झाले आहे. भारतीय पर्यटक आणि इतर नागरिकांना या डिजिटल पेमेंटचा आनंद घेता येईल. त्यांना रोखीत व्यवहार करण्याची गरज उरणार नाही.
भारत जगातील सर्वात वेगवान अर्थव्यवस्था
लूलू रिटेल समूहाचे संचालक मोहम्मद अल्ताफ यांनी जगातील भूराजकीय आणि आर्थिक स्थिती पाहता कतार आणि भारत यांच्यातील संबंध खास असल्याचे म्हटले आहे. कतारने जागतिक स्तराच्या पायाभूत सुविधा निर्माण केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि एक खुली बाजारपेठ आहे. यामध्ये भारतीय कंपन्यांचे स्वागत आहे. भारत ही जगातील सर्वात वेगाने धावणारी अर्थव्यवस्था आहे. भारत आणि कतारचे संबंध चांगले आहेत, असे अल्ताफ म्हणाले.
