Pune IT News : पुण्यात 12 लाखांचं पॅकेज, तरीही वीकेंडला रॅपिडो चालवतात दोन इंजिनिअर्स; कारण काय?
चांगला पगार, कॉर्पोरेट नोकरी आणि स्पोर्ट्स बाईक… तरीही सुट्टीच्या दिवशी हे दोघे पुण्याच्या रस्त्यावर रॅपिडो चालवतात. दिवसभरात किती कमाई होते आणि या निर्णयामागे नेमकं कारण काय?

आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात एका वेगळ्याच घटनेने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. वर्षाला तब्बल १२ लाख रुपयांचं भरघोस पॅकेज असलेल्या दोन सॉफ्टवेअर इंजिनिअर्सची कहाणी सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. चांगला पगार आणि कॉर्पोरेट लाईफ असतानाही हे दोघे वीकेंडला पुण्याच्या रस्त्यांवर रॅपिडो बाईक टॅक्सी चालवताना दिसत आहेत. त्यामुळे सगळीकडे त्यांच्याबद्दल एक कौतुकाची भावना निर्माण होत आहे. पण मग यामागचं कारण काय याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहे. चला तर मग जाणून घेऊयात ही सगळी स्टोरी.
कमाईसोबतच नवीन माणसांशी संवाद
अॅक्सेंचर कंपनीत काम करणाऱ्या एका डेव्हलपरने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर (ट्विटर) आपल्या दोन रूममेट्सची ही गोष्ट शेअर केली. हे दोघेही सॉफ्टवेअर इंजिनिअर असून त्यांचा वार्षिक पगार प्रत्येकी १२ लाख रुपये आहे. त्यांनी सांगितलं की, केवळ जास्तीचे पैसे कमावणे हा यामागील एकमेव उद्देश नसून, नवीन लोकांना भेटणे आणि सुट्टीच्या दिवशी वेगळा अनुभव घेण्यासाठी,आम्ही आमच्या स्पोर्ट्स बाईक रॅपिडोवर नोंदणी करुन घेतल्या आणि या कामाला सुरुवात केली, असं त्यांनी सांगितलं.
दिवसभरात किती झाली कमाई?
सुट्टीच्या दिवशी दिवसभर प्रवाशांची ने-आण केल्यानंतर या दोघांनी केलेल्या कमाईचा आकडा समोर आला आहे. शेअर केलेल्या पोस्टनुसार, एका इंजिनिअरने दिवसभरात फक्त ९०० रुपये (९२९ रुपये) तर दुसऱ्याने ५०० रुपयांची कमाई केली.
नेटकऱ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया
या अनोख्या प्रयत्नावर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी ‘स्ट्रेस बस्टर’ आणि नेटवर्क वाढवण्याचा हा उत्तम मार्ग असल्याचं सांगत या दोघांचं कौतुक केलं. तर दुसरीकडे, पुण्यात आधीच असलेली वाहतूक कोंडी आणि प्रदूषण पाहता सुट्टीच्या दिवशी रस्त्यावर उतरून बाईक चालवणं योग्य वाटत नसल्याचं मत काहींनी मांडलं. एकंदरीत, चांगल्या पगाराची नोकरी सांभाळून वीकेंडला काहीतरी वेगळं करू पाहणाऱ्या पुण्याच्या या दोन इंजिनिअर्सची स्टोरी सध्या चांगलीच गाजत आहे.
