विकृतपणाचा कळस ! 1-2 नव्हे तब्बल 17 शाळकरी मुलींचा विनयभंग, नराधमाला अटक झाली का ?

नागपूरमधून एक अतिशय भयंकर, बातमी समोर आली आहे. तेथे एका इसमाने विकृतपणाचा कळस गाठला. शाळेजवळ असलेल्या दुकानाचे शटर दुरुस्त करण्यासाठी आलेल्या एका तरूणाने शाळकरी मुलींचा विनयभंग केल्याचे समोर आले आहे

विकृतपणाचा कळस ! 1-2 नव्हे तब्बल 17 शाळकरी मुलींचा विनयभंग, नराधमाला अटक झाली का ?
Updated on: Feb 10, 2025 | 11:24 AM

राज्यातील गुन्हेगारीच प्रमाण प्रचंड वाढत चालला असून सामान्य नागरिकांना अगदी जीव मुठीत धरून जगावं लागतंय. महिला-तरूणींच्या सुरक्षिततेचा प्रश्नही अक्षरश: ऐरणीवर आला असून नागपूरमधून एक अतिशय भयंकर, बातमी समोर आली आहे. तेथे एका इसमाने विकृतपणाचा कळस गाठला. शाळेजवळ असलेल्या दुकानाचे शटर दुरुस्त करण्यासाठी आलेल्या एका तरूणाने शाळकरी मुलींचा विनयभंग केल्याचे समोर आले आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे त्याने 1-2 नव्हे तर तब्बल 17 शाळकरी मुलींशी ही अश्लील वर्तणूक केल्याचेही उघ़ड झाले. यामुळे प्रचंड खळबळ माजली असून नंदनवन पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला बेड्या ठोकल्या. रवि लाखे( वय 32) असे नराधम आरोपीचे नाव आहे.

काही दिवसांपूर्वीच नागपूरमध्येच एका समुपदेशकाने वर्षोनवर्ष शेकडो मुली, तरूणी, महिलांचे लैंगिक शोषण केल्याची घटना उघडकीस आली होती. त्यामुळे वातावरण तापलेले असतानाच आता या दुसऱ्या नराधमाचा हा भयानक गुन्हा उघड झाला आहे.

शटर दुरूस्त करायला आला होता आरोपी

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना नागपूरातील नंदनवन पोलीस स्टेशन हद्दीत घडली आहे. तेथील परिसरात एक नामांकित शाळा आहे, त्याच शाळेच्या बाजूला स्टेशनरीचं एक दुकान आहे. त्या दुकानाचे शट नादुरूस्त झाले होते, त्यामुळे दुकानमालकाने त्याच्या दुरूस्तीसाठी आरोपी लाखे याला बोलावलं होतं. शनिवारी दुपारी तो त्या दुकानाचं काम करण्यासाठी आला होता. मात्र त्याची मानसिकता विकृत असून तो काम सोडून जवळच असलेल्या शाळेच्या गेटजवळ उभा राहिला आणि येणाऱ्या जाणाऱ्या मुलींकडे वाईट नजरेने पहात होता.

तेथील एका पालकाने त्याला हटकल्यानंतर तो तेथून दूर गेला आणि दुकानात कामासाठी परतला. स्टेशनरी दुकान उघडं असल्याचं पाहून काही मुली दुकानात आल्या आणि काही वस्तू मागितल्या. मात्र तेव्हा दुकानाचा मूळ मालक, दुकानदार तेथे नव्हता. याच गोष्टीचा फायदा घेत आरोपीने त्या मुलींना आत बोलावलं. तो त्या शाळकरी मुलींना नको तिथे स्पर्श करून त्यांच्याशी अश्लील चाळे करू लागला. काही मुलींनी घाबरुन तेथून पळ काढला. जवळपास दोन तासांच्या वेळेत 17 मुली त्या दुकानात आल्या. आरोपीने त्यांना बिस्कीट-चॉकलेटचं आमिष दाखवत आत बोलावलं आणि नको ते चाळे केले.

दोन मुलींच्या हिमतीने गुन्हा उघड

मात्र पीडित मुलींपैकी दोघींनी हिंमत गोळा केली आणि शाळेत घेण्यासाठी त्यांचे पालक आल्यावर घडलेला हा सगळा प्रकार त्यांना सांगितला. मुलींकडून ही माहिती मिळताच पालक हादरलेच, त्यांनी तातडीने नंदनवन पोलिस स्टेशन गाठत तेथील अधिकाऱ्यांना ही माहिती दिली. लेखी तक्रारही केली. त्यानंतर पोलिसांनीही तातडीने गुन्हा दाखल करत त्या दुकानात जाऊन आरोपी रवि याला बेड्या ठोकून अटक केली. पण या घटनेमुळे शाळकरी मुला-मुलींच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.