Abu Salem : मुंबई हादरलेली, 257 नागरिकांचा झालेला मृत्यू, गँगस्टर अबू सालेमचा मुदतपूर्व सुटकेसाठी अर्ज
Abu Salem : न्यायमूर्ती सारंग व्ही कोतवाल आणि न्यायमूर्ती श्रीराम एम मोडक यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर सोमवारी या याचिकेचा उल्लेख केल्यानंतर याचिका 10 मार्च रोजी सुनावणीसाठी सूचीबद्ध केली जाईल, असे म्हटले आहे.

मुंबईला हादरवून सोडणाऱ्या 1993 सालच्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात गँगस्टर अबू सालेमने माफी मिळावी आणि मुदतपूर्व सुटकेसाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. 1993 च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झालेल्या गँगस्टर अबू सालेमने नुकतीच मुंबई उच्च न्यायालयात आपल्या शिक्षेला माफी मिळावी आणि तुरुंगातून मुदतपूर्व सुटकेसाठी याचिका दाखल केली आहे. भारत आणि पोर्तुगाल यांच्यातील प्रत्यार्पण करारानुसार त्याने सुमारे 25 वर्षे तुरुंगवास भोगला आहे.
त्यामुळे त्याला तुरुंगातून सुटण्याची तात्पुरती तारीख देण्यात यावी, असा दावा सालेमने वकील फरहाना शाह यांच्यामार्फत केलाय. न्यायमूर्ती सारंग व्ही कोतवाल आणि न्यायमूर्ती श्रीराम एम मोडक यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर सोमवारी या याचिकेचा उल्लेख केल्यानंतर याचिका 10 मार्च रोजी सुनावणीसाठी सूचीबद्ध केली जाईल, असे म्हटले आहे.
मुंबई हादरलेली, किती नागरिकांचा मृत्यू झालेला?
अबू सालेम आता 63 वर्षांचा आहे. भारताकडे प्रत्यर्पण होण्याआधी पोर्तुगालच्या तुरुंगातील कारावास, खटला सुरु असतानाच्या काळातील तुरुंगवास असा कालावधी 25 वर्षांचा होतो. त्याशिवाय भारत आणि पोर्तुगालमध्ये प्रत्यर्पण कराराच्या ज्या अटी होत्या, त्या आधारावर अबू सालेमने लवकर सुटकेची मागणी केली आहे. 3 फेब्रुवारीला त्याने याचिका दाखल केली.
अबू सालेमवर काय जबाबदारी होती?
1993 सालच्या मुंबई बॉम्बस्फोट मालिकेत विविध ठिकाणी शस्त्रास्त्र, दारुगोळा पोहोचवण्याचा अबू सालेमवर आरोप होता. 12 मार्च 1993 रोजी मुंबईत 12 ठिकाणी शक्तीशाली बॉम्बस्फोट झाले. मुंबई शेअर बाजार, झवेरी बाजार, एअर इंडिया इमारत, सी रॉक हॉटेल, जुहू सेंटॉर हॉटेल आणि अन्य ठिकाणी शक्तीशाली बॉम्बस्फोट झाले. यात 257 निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला. 713 जण जखमी झाले होते.