
शिक्षणाचा प्रसार वाढत असूनही लोक बुवाबाजीच्या मागे लागले आहेत. अजूनही देशात अशा बुवाबाजीतून फसवणूक होण्याचे प्रकार वाढत असतात. कोणी गुप्त धनाच्या शोधासाठी आपली जमापुंजी या भोंदूबाबांच्या चरणी वाहतात तर कोणी पैसे दुप्पट करण्यासाठी चमत्कारावर विश्वास ठेवून पैसा खर्च करतात. आणि त्यानंतर मग आपली पुरती फसगत झाल्याचे उघडकीस आल्यानंतर असे लोक जागे होतात. आता नवीमुंबई सारख्या आधुनिक शहरात असा प्रकार घडला आहे. पैसे डबल करतो म्हणून भोंदूबाबाने एका कुटुंबाला २० लाखांना गंडा घातला आहे.
नवी मुंबईत सीबीडी येथे एक धक्कादायक प्रकार घडला आहे. येथील एका कुटुंबाला पैसे डबल करून देतो म्हणून भोंदू बाबाने घरात पूजा करून त्यांचे वीस लाख रुपये घेऊन पोबारा केला होता. या प्रकरणाची फिर्यादीने तक्रार दाखल केली सीबीडी पोलीस स्टेशनमध्ये सीबीडी पोलिसांनी अवघ्या 24 तासाच्या आत या भोंदूबाबाला आणि त्याच्या चालकाला अटक केली आहे.
या भोंदूबाबाचं नाव सचिन शर्मा असे आहे. या भोंदू बाबाची आणि फिर्यादीची ओळख काही दिवसांपूर्वी झाली होती तेव्हा भोंदूबाबा त्यांच्या घरी आला आणि 20 लाख रुपये पुढे ठेवा मी तुम्हाला डबल करून देतो असे म्हणाला आणि त्यानंतर तंत्र पूजा सुरू केली आणि सर्वांनी डोळे बंद केल्यानंतर त्या भोंदू बाबांना तिथून पळ काढला. या भोंदू बाबाला लगेच सीबीडी पोलिसांनी अटक केली आहे आणि एकूण 19 लाख रुपये रोकड जप्त देखील केली आहे. कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नका अशी प्रतिक्रिया एसीपी मयूर भुजबळ यांनी दिली आहे. अशाप्रकारे पैसे डबल होतं नाहीत नागरिकांनी अफवांच्या आहारी जाऊ नये असेही ते म्हणाले.