
अहिल्यानगर येथे एक भीषण अपघात घडला आहे. श्रीगोंदा तालुक्यातील घारगाव – कोळगाव रोडवर असलेल्या माऊली मंदिराजवळ वाहानांची भीषण धडक होऊन मोठ्ठा अपघात झाला. यामध्ये 4 जणांचा मृत्यू झाला, त्यापैकी तिघे हे एकाच कुटुंबातील असल्याचे समजते. ट्रक आणि इको कार समोरासमोर येऊन भीषण धडक बसली. ही धडक एवढी जोरदार होती की त्यामध्ये चौघांचा जागीच मृत्यू झाला. तर एक लहान मुलगा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातग्रस्त दोन्ही वाहानांचा अक्षरश: चेंदामेंदा झाला. एकाच कुटुंबाती तिघांनी जीव गमावल्यामुळे कुटुंबावर तर दु:खाचा मोठा डोंगर कोसळला.
एकाच कुुटंबातील तिघे गेले, मुलगा वाचला
मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे तीनच्या सुमारास श्रीगोंदा तालुक्यातील घारगाव – कोळगाव रोडवर असलेल्या माऊली मंदिराजवळ दोन वाहनांची धडक झाली. इकोकार आणि ट्रक एकमेकांवर प्रचंड वेगाने आदळले. या अपघातात कारचालकासह आणखी तिघांचा, एकूण 4 नागरिकांचा जागीच मृत्यू झाला. त्यापैकी तिघे जण हे एकाच कुटुंबातील असल्याची माहिती समोर आली आहे . नितीन कोकाटे (कारचालक), गजानन पायघन, ध्रुपता पायघन, वैभव पायघन अशी मृत व्यक्तींची नावं आहेत.
तर याच कारमध्ये करण पायघन हा 13 वर्षांचा मुलगाही होता. अपघाता त्याचा जीव वाचला मात्र त्याला जबर मार लागला आहे. त्याच्यावर नजीकच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात होताच ट्रक ड्रायव्हर मात्र घटनास्थळावरू लागलीच पळाला, तो फरार झाला. अपघाताची माहिती मिळताच बेलवंडी पोलिसा ठाण्यातील अधिकाऱ्यांवी घटनास्थळी धाव घेतली, गावकऱ्यांच्या मदतीने बचावकार्य सुरू करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, पायघन कुटुंबीय हे मूळचे अकोले जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील मळतूर येथील रहिवासी आहेत. मात्र कामानिमित्त ते श्रीगोंदा येथील चिंभळे गावात रहात होते. मंगळवारी पहाटे ते गवाहून चिंभळे येथे परत येत होते, तेव्हाच तीनच्या सुमारासदौंड येथून नगरच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकची माऊली मंदिराजवळ त्यांच्या कारला धडक बसली आणि अपघात झाला. बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार ट्रक ड्रायव्हरचा कसून शोध घेण्यात येत आहे.