अहमदनगरमध्ये पत्रकाराची दगडाने ठेचून हत्या, राहुरीत मृतदेह आढळला

अहमदनगरमध्ये पत्रकाराची दगडाने ठेचून हत्या, राहुरीत मृतदेह आढळला
प्रातिनिधिक फोटो

मंगळवारी दुपारी रोहिदास दातीर यांचे अपहरण करण्यात आले होते, त्याच रात्री त्यांचा मृतदेह आढळला (Ahmednagar Journalist Rohidas Datir Murder)

अनिश बेंद्रे

| Edited By: सचिन पाटील

Apr 07, 2021 | 6:01 PM

अहमदनगर : अहमदनगरमध्ये पत्रकाराची अपहरण करुन हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष आणि माहिती अधिकार कार्यकर्ते रोहिदास दातीर यांची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली. (Ahmednagar Journalist Rohidas Datir Murder in Rahuri)

स्कॉर्पिओ गाडीतून अपहरण

अहमदनगर जिल्ह्यातील राहुरीमध्ये ही घटना घडली. मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास रोहिदास दातीर यांचे अपहरण करण्यात आले होते. पत्रकार दातीर राहुरी शहरातील मल्हारवाडी रोडने आपल्या दुचाकीवरून घरी जात होते. त्यावेळी अज्ञात व्यक्तींनी मारहाण करत त्यांना स्कॉर्पिओ गाडीत बसवले आणि निघून गेले. पोलिसांना याविषयी माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

कॉलेज रोड परिसरात मृतावस्थेत

पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करुन दातीर यांचा शोध घेण्याची मोहीम हाती घेतली. त्याच रात्री अहमदनगरमधील राहुरी कॉलेज रोडला रोहिदास दातीर यांचा मृतदेह आढळला. दगडाने ठेचून दातीर यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती.

आरटीआयच्या माध्यमातून भ्रष्टाचार उघडकीस

दक्ष पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष असलेल्या रोहिदास दातीर यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून राहुरी तालुक्यातील अनेक गोष्टी बाहेर काढल्या होत्या. रोहिदास दातीर यांनी आरटीआयच्या माध्यमातून अनेक भ्रष्टाचार उघडकीस आणले होते. याच कारणामुळे त्यांची हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

दरम्यान, पोलीसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून आरोपींचा शोध सुरु आहे. मात्र पत्रकाराची हत्या झाल्यामुळे अहमदनगर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. (Ahmednagar Journalist Rohidas Datir Murder)

दिल्लीत पत्रकाराची हत्या

गेल्या वर्षी भाचीशी छेडछाड केल्याची पोलिसात तक्रार केल्याने दिल्लीत पत्रकार विक्रम जोशी यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. जोशींना त्यांच्या मुलींच्या डोळ्यादेखत गोळी घालण्यात आली होती. आपल्या भाचीशी छेडछाड केल्याची तक्रार विक्रम जोशी यांनी पोलिसांकडे दिली होती. याचा सूड घेण्यासाठीच गुंडांनी हल्ला केला होता.

संबंधित बातम्या :

रेखा जरे हत्या प्रकरणाचा सूत्रधार सापडला, बाळ बोठेला हैदराबादमध्ये बेड्या

भाचीच्या छेडछाडीची तक्रार दिल्याचा राग, मुलींसमोर गुंडांचा गोळीबार, पत्रकाराचा मृत्यू

(Ahmednagar Journalist Rohidas Datir Murder)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें