
आपल्यावर दाखल झालेल्या विनयभंगाच्या गुन्ह्याचा बदला घेण्यासाठी एका तरुणाने फिर्यादीच्या वडील आणि भावावर हत्येच्या प्रयत्नाचा खोटा गुन्हा दाखल केल्याचा धक्कादायक प्रकार अंबरनाथमध्ये उघडकीस आला आहे. पोलिसांनी या कटाचा पर्दाफाश करत आरोपी तरुणासह त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल करून त्यांना बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेनंतर अंबरनाथमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
अंबरनाथच्या जावसई परिसरात राहणाऱ्या आकाश अमरजित गुप्ता याच्यावर दोन वर्षांपूर्वी सोनल जैस्वार या तरुणीने विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा बदला घेण्यासाठी आकाशने सोनलचे वडील आणि भावाला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा कट रचला. आकाश गुप्ता याच्यासह त्याचा भाऊ कन्हैय्या गुप्ता, सिद्धार्थ गायकवाड, मोनू कश्यप, आदित्य जैस्वार आणि अजित चौहान यांनी मिळून खुनाच्या प्रयत्नाचा बनाव रचला. या कटासाठी कन्हैय्याने वस्तरा आणला, मोनू कश्यप आणि आदित्य जैस्वारने ब्लेड आणले. सिद्धार्थ गायकवाड याने स्वतःच्याच मित्र अजित चौहानवर वार केले. त्यानंतर मोनू आणि आदित्यने अजित चौहानला तातडीने सेंट्रल हॉस्पिटलमध्ये दाखल केले.
यानंतर पोलिसांनी जखमी झालेल्या अजित चौहानचा रुग्णालयात जबाब नोंदवला. त्यावेळी त्याने पोलिसांना दिलेल्या जबाबात सोनल जैस्वारचे वडील नागेंद्र जैस्वार आणि भाऊ आदित्य जैस्वार (पीडितेचा भाऊ) यांनी आपल्यावर हल्ला केल्याचा आरोप केला. त्यानुसार पोलिसांनी सुरुवातीला नागेंद्र आणि आदित्य जैस्वार यांच्यावर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला. मात्र, पोलिसांनी केलेल्या तांत्रिक तपासात गुन्हा घडल्याच्या वेळी नागेंद्र जैस्वार आणि आदित्य जैस्वार (पीडितेचा भाऊ) घटनास्थळी नसल्याचे स्पष्ट झाले. तसेच, मागील विनयभंगाच्या गुन्ह्याचा संदर्भ मिळाल्याने पोलिसांचा संशय बळावला. त्यामुळे त्यांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला.
पोलिसांनी केलेल्या तपासात आकाश गुप्ता आणि त्याच्या साथीदारांनी नागेंद्र आणि आदित्य जैस्वार यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी हा बनाव रचल्याचे समोर आले. यानंतर अंबरनाथ पोलिसांनी आकाश गुप्ता, कन्हैया गुप्ता, सिद्धार्थ गायकवाड, मोनू कश्यप, आदित्य जैस्वार आणि अजित चौहान या सर्व आरोपींविरोधात कट रचणे, खोटी माहिती पुरवणे, आणि गुन्ह्याचा खोटा आरोप करणे या कलमांखाली ‘सुमोटो’ गुन्हा दाखल करत त्यांना तात्काळ अटक केली. या प्रकरणाचा उलगडा अंबरनाथ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद आणि डीबी पथकाचे एपीआय विजय काजारी यांच्या सतर्कतेमुळे झाल्याची माहिती पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिली.