हळदीच्या कार्यक्रमात वाद झाला, मग वाद विकोपाला गेला अन् घरातच राडा झाला !

रात्री हळदीच्या कार्यक्रमात गावातील शेतकऱ्याचा चौघा गावकऱ्यांशी वाद झाला. या वादातून शेतकऱ्यावर हल्ला केल्याची घटना कल्याणमध्ये घडली.

हळदीच्या कार्यक्रमात वाद झाला, मग वाद विकोपाला गेला अन् घरातच राडा झाला !
हळदीच्या कार्यक्रमात झालेल्या वादातून हल्ला
Image Credit source: TV9
| Updated on: May 23, 2023 | 11:39 AM

कल्याण : हळदीच्या कार्यक्रमात झालेल्या वादातून कल्याणमध्ये एका शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे. चार जणांनी शेतकऱ्यावर हल्ला चढवत त्याला जखमी केले. तसेच याबाबत पोलिसांना माहिती दिल्यास कुटुंबाला जीवे मारण्याचीही धमकी दिली. हल्ला केल्यानंतर चौघेही आरोपी फरार झाले आहेत. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहेत. सर्व गावातीलच रहिवासी आहेत. विष्णु हरी पाटील असे मारहाण झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. एकीकडे पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत, तर दुसरीकडे या घटनेमुळे गावात तणावाचे वातावरण आहे.

हळदीच्या कार्यक्रमात वाद झाला होता

विष्णु पाटील हे शिरढोण गावात कुटुंबासह राहतात. पाटील यांचा गावातील चौघांसोबत हळदीच्या कार्यक्रमात वाद झाला होता. यानंतर ते रात्री घरी आले आणि झोपले होते. रविवारी सकाळी आठच्या दरम्यान ते घरात झोपले असताना चौघे जण हे शिवीगाळ करत घरात घुसले. लाकडी दांडक्यांनी चौघांनी पाटील यांना बेदम मारहाण केली. यानंतर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यास तुझ्यासह कुटुबीयांना मारुन टाकू, अशी धमकी दिली.

आरोपी फरार

या घटनेनंतर विष्णु पाटील यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार केली. पोलिसांनी हल्लेखोर पाटील कुटुंबीयांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. आरोपी फरार आहेत. या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळू वंजारे अधिक तपास करत आहेत. विलास भगवान पाटील, सुनील भगवान पाटील, मयूर गुरुनाथ पाटील, सोनल विलास पाटील अशी फरार आरोपींची नावे आहेत.