
तेलंगणाच्या संगारेड्डी जिल्ह्यात एका हत्येने भयानक खळबळ माजली आहे. तिथे इंजिनिअरिंगच्या एका विद्यार्थ्याला, त्याच्या प्रेयसीच्या आई-वडिलांनी मारहाण करून ठार केलं. या भयानक घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून त्या मुलाचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. तसेच या प्रकरणाचा तपासही सुरू करण्यात आला आहे. आपल्या मुलाच्या मृत्यूने त्याच्या कुटुंबियांना अतिशय मोठा धक्का बसला असून रडून-रडून त्यांची अवस्था वाईट झाली आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ माजली असून नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ज्योति श्रवण साई असे मृत तरूणाचे नाव आहे. तो संगारेड्डी जिल्ह्यातील मैसमगुडा येथील सेंट पीटर्स इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये बी.टेकचा द्वितीय वर्षाचा विद्यार्थी होता. कुथबुल्लापूर येथे एका भाड्याच्या घरात तो राहत होता. बीरमगुडा येथील इसुकाबावी येथील 19 वर्षीय श्रीजलासोबत श्रवणचे प्रेमसंबंध होते. दोघांचं एकमेकांवर प्रेम तर होतं पण श्रीजलाच्या कुटुंबाला त्यांचं हे नातं मान्य नव्हतं. त्यांनी श्रवणला अनेक वेळा त्यांच्या मुलीपासून दूर राहण्याचा इशारा दिला होता.
लग्नाची बोलणी करण्यासाठी घरी बोलावलं पण..
पण तरीही श्रवण आणि श्रीजला यांचं नातं कायम होतं. (हत्येची) ही दुर्दैवी घटना घडली तेव्हा श्रीजलाच्या आई-वडिलांनी लग्नाची बोलणीच करण्यासाठी श्रवणला त्यांच्या घरी बोलावलं. मात्र तो घरात येताच श्रीजलाच्या आई आणि वडिलांनी त्याच्यावर जोरदार हल्ला केला. त्यांनी श्रवणला क्रिकेट बॅटने बेदममारहाण केली, ज्यामुळे तो गंभीर जखमी झाला. त्याच्या डोक्याला दुखापत झाली, त्याचे पाय आणि बरगड्यांना फ्रॅक्चर झाले. या हल्ल्याच्या घटनेनंतर त्याला कुकटपल्ली येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, मात्र तिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
क्रिकेट बॅटने केली हत्या
या हत्याकांडाची माहिती मिळताच, अमीनपूर पोलिस ठाण्याचे पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी खुनाचा गुन्हा दाखल करत या प्रकरणाचा तपास सुरू केला. पोलिसांनी घटनास्थळावरून क्रिकेट बॅट देखील जप्त केली आहे. या हल्ल्यामागील हेतू काय तसेच पालकांव्यतिरिक्त या हल्ल्यात आणखी कोण सामील होते याचा तपास करत आहेत असं पोलिसांनी सांगितलं.