
कोलकाता येथे ज्यूनियर महिला डॉक्टर सोबत घडलेल्या घटनेमुळे संपूर्ण देशात संतापाची भावना आहे. देशाच्या वेगवेगळ्या भागात अजूनही या घटनेविरोधात निदर्शने, आंदोलन सुरु आहेत. एका नराधमाने हॉस्पिटलमध्ये ज्यूनियर महिला डॉक्टरवर बलात्कार करुन तिची हत्या केली. अशाच प्रकारची एक घटना महाराष्ट्रात सुद्धा घडली आहे. मुंबई जवळ असलेल्या बदलापूरमध्ये जनता रस्त्यावर उतरली आहे. जनतेकडून तीव्र निदर्शने सुरु आहेत. आज बदलापूर बंदची हाक देण्यात आली आहे. बदलापूर येथे एका नामांकीत शाळेत दोन चुमिकलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली आहे.
ही घटना उजेडात आल्यानंतर बदलापूरकरांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे. शाळेच्या गेटवर पालकांच आंदोलन सुरु आहे. बदलापूरमध्ये रुळावर उतरुन लोकांनी रेल रोको आंदोलन केलं. यामुळे मध्य रेल्वेच्या कल्याण ते कर्जत मार्गावरील वाहतूक मागच्या एक तासापासून ठप्प आहे. शाळेने या प्रकरणी दोन सहाय्यक महिलांना निलंबित केलय. शाळेने माफीनामा सुद्धा लिहून दिलाय. आरोपींवर कठोरात कठोर कारवाई व्हावी म्हणून बदलापूरकर रस्त्यावर उतरले आहेत.
‘सरकार काहीच करत नाहीय’
रेल्वे रुळावर आंदोलनाला बसलेल्या एका महिलेला प्रतिक्रिया विचारली असता तिने तीव्र शब्दात संताप व्यक्त केला. “महाराष्ट्रात बलात्काराचे प्रकार होतायत. सरकार काहीच करत नाहीय. जिथे हे प्रकार घडलेत, त्यांना तसेच कापा. एका माणसामुळे सगळी पब्लिक सकाळी सहा वाजल्यापासून इथे बसली आहे. तुम्ही त्याला सुरक्षा देता. पब्लिकला, मुलीला सुरक्षा देत नाही. सरकार काय करतय? लाडकी बहीण योजना आणता, त्यापेक्षा बहिणीला सुरक्षा द्या. काय करायचीय तुमची लाडकी बहिण योजना? 1500 रुपये देता, भिखारी आहे का?” अशी प्रतिक्रिया या महिलेने दिली.