
Bhiwandi Crime News : पती-पत्नीचं नातं हे फार पवित्र असतं. एकदा लग्न झाल्यावर हे नातं शेवटपर्यंत टिकवायचं असतं. मात्र क्षुल्लक भांडणामुळे कधीकधी पती-पत्नींचं हे नातं भयानक रुप धारण करू शकतं. असाच एक गंभीर प्रकार भिवंडीमध्ये समोर आला आहे. येथे एका नराधम नवऱ्याने आपल्या पत्नीचा निर्घृण खून केला आहे. त्याने आपल्या पत्नीचं शीर धडावेगळं केलं असून तिचे तब्बल 17 तुकडे केल्याचे समोर आले आहे. या धक्कादायक घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणातील आरोपीचे नाव ताहा असे आहे. तर मृत महिलेचे नाव शबाना (नाव बदलले आहे) मोहम्मद तारा अंसारी असे आहे. शबानाची हत्या करून ताहाने तिचे शिर धडावेगळे केले तसेच तिच्या शरीराचे तब्बल 17 तुकडे केल्याचे समोर आले आहे. 30 ऑगस्ट रोजी इदगाह रोडजवळ असलेल्या कत्तलखान्याच्या परिसरात एका महिलेचा शीर नसलेला मृतदेह आढळला होता. याप्रकरणाचा तपास करत असताना पोलीस आरोपी ताहापर्यंत पोहोचले आणि या निर्घृण खुनाचा कांड समोर आला.
पोलिसांनी ताहाला अटक केली असून त्याची चौकशी चालू आहे. चौकशीदरम्यान ताहाने उडवाउडवीची आणि संशयास्पद अशी उत्तरं दिली त्यानंतर पोलिसांचा त्याच्यावरील संशय बळावला. शबाना यांच्या शरीराच्या इतर तुकड्यांचा शोध घेतला जात आहे. त्यासाठी ड्रोन, अग्निशमन दलाचीही मदत घेतली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार शबाना यांच्या आईने पोलिसांत मुलगी हरवल्याची तक्रार दिली होती. दोन दिवसांपासून माझ्या मुलीचा फोन बंद आहे. तसेच माझा जावई ताहा हादेखील फोन उचलत नाहीये, असे या तक्रारीत म्हणण्यात आले होते. त्यानंतर पोलिसांनी इदगाह रोडवर 30 ऑगस्ट रोजी आढळलेल्या धड नसलेल्या डोक्याचा फोटो दाखवला आणि शबाना यांचा खून झाल्याचे समोर आले.
भिवंडी येथील भोईवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी यांनी या प्रकरणाबाबत सविस्तर माहिती दिली आहे. शबाना यांची हत्या नेमकी कुठे झाली? शबाना यांच्या शरीराचे तुकडे नेमके कुठे आहेत? या सर्व गोष्टींचा शोध घेतला जात आहे.