भोसरी जमीन घोटाळा, एकनाथ खडसेंना मोठा दणका, जावई गिरीश चौधरींना ईडीची अटक

| Updated on: Jul 07, 2021 | 11:16 AM

फडणवीस सरकारमध्ये महसूल मंत्री असताना एकनाथ खडसे यांनी पुण्यातील भोसरी येथे 3.1 एकर एमआयडीसी प्लॉट खरेदी करण्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप 2016 मध्ये झाला होता

भोसरी जमीन घोटाळा, एकनाथ खडसेंना मोठा दणका, जावई गिरीश चौधरींना ईडीची अटक
एकनाथ खडसे
Follow us on

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना मोठा दणका मिळाला आहे. पुण्यातील भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी खडसेंचे जावई गिरीश चौधरी (Girish Chaudhari) यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात मंगळवारी 13 तास कसून चौकशी केल्यानंर गिरीश चौधरींना रात्री अटक करण्यात आली. ईडीची सिडी लावण्याचा इशारा देणाऱ्या एकनाथ खडसे यांना सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. याआधी, भोसरी भूखंड प्रकरणात एकनाथ खडसे यांची जानेवारी महिन्यात ईडीने चौकशी केली होती. (Pune Bhosari Land Scam NCP Leader Eknath Khadse Son in Law Girish Chaudhari arrested by ED)

पावसाळी अधिवेशनात विधानसभा तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्यासोबत गैरवर्तन केल्यामुळे भाजपचे 12 आमदार निलंबित झाले होते. अधिवेशन संपून काही तास उलटत नाहीत, तोच राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे.

काय आहे भोसरी जमीन घोटाळा?

फडणवीस सरकारमध्ये एकनाथ खडसे महसूल मंत्री असताना त्यांनी पुण्यातील भोसरी येथे 3.1 एकर एमआयडीसी प्लॉट खरेदी करण्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप 2016 मध्ये झाला होता. 31 कोटी रुपयांची किंमत असलेल्या या भूखंडाची निव्वळ 3.7 कोटी रुपयांना विक्री झाल्याचा दावा केला गेला होता. रेडी रेकनर दरापेक्षा खूपच कमी बाजारमूल्य दाखवून जमिनीची खरेदी झाल्याचा आरोप आहे.

हा भूखंड अब्बास उकानी यांच्या मालकीचा होता. त्यांच्याकडून एमआयडीसीने 1971 मध्ये तो अधिग्रहण केला होता, परंतु उकानी यांना नुकसान भरपाई देण्याचा मुद्दा न्यायालयात प्रलंबित आहे. खडसे यांनी 12 एप्रिल, 2016 रोजी बैठक बोलावली आणि अधिकाऱ्यांना जमीन उकानींना परत द्यावी की त्यांना जास्त नुकसानभरपाई द्यावी याविषयी त्वरित निर्णय घेण्याचे निर्देश दिल्याचा दावा केला जातो. पंधरवड्यातच उकानी यांनी खडसे यांच्या नातलगांना (पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी) भूखंड विक्री केल्याचं समोर आलं होतं.

ईडी लावली तर मी सीडी लावेन, एकनाथ खडसेंचा इशारा

एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतानाच आपल्यामागे ईडीचा ससेमिरा लागण्याची शक्यता व्यक्त केली होती. मात्र, भाजपने ईडी लावली तर आपण सीडी लावू, असा इशारा एकनाथ खडसे यांनी दिला होता. मला एकदा जयंत पाटील यांनी विचारलं की तुम्ही राष्ट्रवादीत येणार का? तर मी त्यांना सांगितलं की तुम्ही घेतलं तर येईन. तर त्यावेळी जयंत पाटील म्हणाले, तुम्ही आलात तर ते तुमच्यामागे ईडी लावतील, असे आमचे गमतीत बोलणं सुरु होतं. पण आता सांगतो जर त्यांनी ईडी लावली, तर मी सीडी लावीन, असे खडसे यांनी म्हटले होते.

भोसरी जमीन खरेदी प्रकरणात खडसेंची भूमिका

“एमआयडीसीच्या जमिनीशी माझा दुरान्वये संबंध नाही, एक इंचही जमीन मी घेतली नाही. माझा व्यवहार झालेला नाही. उताऱ्यावर मूळ मालकाचे नाव आहे, एमआयडीसीचे नाव नंतर आहे. मुळात मी महसूल मंत्री होतो, म्हणून पदाचा गैरवापर करण्याचा काय संबंध? माझ्या बायको आणि जावयाने काय व्यवहार करायचे नाहीत का? समजा अमृता फडणवीस यांनी व्यवहार केला, तर तो काय देवेंद्र फडणवीस यांच्या पदाचा गैरवापर होतो का? किंवा त्यांनी एखादा कार्यक्रम केला, तर काय फडणवीस यांच्या आशीर्वादाने झाला, असे होते का? त्यांच्या त्या स्वतंत्र आहेत. तशी माझी बायको स्वतंत्र आहे, माझा जावई एनआरआय आहे, त्यालाही अधिकार आहेत” असं खडसे काही महिन्यांपूर्वी म्हणाले होते.

संबंधित बातम्या :

भूखंड घोटाळ्यात फडणवीसांचीही चौकशी करा, अंजली दमानियांची कोर्टात मागणी

(Pune Bhosari Land Scam NCP Leader Eknath Khadse Son in Law Girish Chaudhari arrested by ED)