
गुजरातच्या भावनगरमध्ये अशी घटना समोर आली आहे ज्याने संपूर्ण परिसर हादरला आहे. येथे एका महिलेचा मृत्यू तिच्या होणाऱ्या नवऱ्यामुळे झाला. हे सर्व तेव्हा घडले जेव्हा दोघांचे लग्न होण्यास फक्त एक तास शिल्लक होता. एक तासाभरापूर्वी दोघांमध्ये नेमकं काय घडलं? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. हत्या केल्यानंतर आरोपी तेथून फरार झाला आहे. पोलिस या प्रकरणाची चौकशी करत असून आरोपीचा शोध घेत आहेत. आता नेमकं काय घडलं जाणून घ्या…
दीड वर्षापासून एकत्र राहत होते
पोलिसांच्या म्हणण्यानुसार सज्जन बरैया आणि सोनी हिम्मत राठौड गेल्या एक ते दीड वर्षापासून एकत्र राहत होते. दोघांचा साखरपुडा झाला होता. त्याच्या या नात्याला घरच्यांची नाराजी असूनही दोघांनी एकत्र राहणे आणि लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्नाची तारीख ठरली होती आणि शनिवार रात्री त्यांचे लग्न होणार होते. बहुतांश रीतिरिवाजही पूर्ण झाले होते. लग्नाच्या काही वेळापूर्वी दोघांमध्ये घरात काही कारणावरून भांडण सुरू झाले. हा वाद एका साडी आणि पैशांवरून होता. सुरुवातीला प्रकरण सामान्य होते, पण हळूहळू बाब इतकी वाढली की वातावरण तणावपूर्ण झाले.
संतापात येऊन केला हल्ला
पोलिसांचे म्हणणे आहे की वादादरम्यान सज्जनचे रागावर नियंत्रण राहिले नाही. आरोप आहे की त्याने प्रथम लोखंडी पाईपने सोनीवर हल्ला केला आणि नंतर तिचे डोके भिंतीवर आपटले. गंभीर जखमांमुळे सोनीचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर सज्जनने घरात तोडफोड केली आणि तेथून पळ काढला. शेजाऱ्यांनी आवाज ऐकून पोलिसांना माहिती दिली. टीम त्वरित घटनास्थळी पोहोचली आणि घराची अवस्था पाहून थक्क झाली. सोनीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. पोलिसांनी सांगितले की दोन्ही कुटुंबीयांचा या नात्याला विरोधात होता. पण जोडप्याने आपल्या इच्छेने एकत्र राहण्याचा मार्ग निवडला होता.
लग्नाच्या दिवशी शेजाऱ्याशीही भांडण
या प्रकरणात आणखी एक बाब समोर आली आहे. त्या दिवशी सज्जनची एका शेजाऱ्याशीही खटके उडाले होते. याची तक्रारही पोलिसांत नोंदवली आहे. आता हत्येच्या या प्रकरणात स्वतंत्र FIR दाखल करून तपास सुरू करण्यात आला आहे. पोलिस हे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत की घटनेच्या वेळी घरात आणखी कोण कोण उपस्थित होते आणि भांडण कसे वाढले. सध्या आरोपी फरार आहे आणि त्याचा शोध सुरू आहे.