
पुण्यासह राज्यभरातील गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. पुण्यात चक्क क्लास वन ऑफिसर असलेल्या पतीने आपल्याच क्लास वन ऑफिसर असलेल्या पत्नीचा घरातच स्पाय कॅमेरे लावून अंघोळीचा व्हिडिओ रेकॉर्ड केला असल्याचा प्रकार समोर आला आहे. यानंतर या अधिकाऱ्याने पत्नीला ब्लॅकमेल केल्याचेही समोर आले आहे. आता पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
अधिकाऱ्याने पत्नीचे व्हिडिओ केले रेकॉर्ड
मिळालेल्या माहितीनुसार, या ऑफिसरने पत्नीला रेकॉर्ड केलेले व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत माहेरून गाडी आणि कारच्या हप्त्यासाठी माहेरून दीड लाख रुपये आणण्याची जबरदस्ती केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी 30 वर्षीय पत्नी आणि महिला क्लास वन ऑफिसरने आंबेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. आता याप्रकरणी 7 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
पोलिसांनी आरोपी पतीसह महिलेच्या सासरच्या 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यात सासू, सासरा, दीर आणि इतर नातेवाईकांचा समावेश आहे. 2020 साली या अधिकारी महिलेचं लग्न झालं होतं. दोघांचा संसार सुखाचा सुरु होता. मात्र काही काळापूर्वी ऑफिसर पतीला पत्नीवर संशय आला. त्याने तिला त्रास द्यायला सुरुवात केली. वारंवार पैशांची मागणी सुरु होती. तसेच त्याने पत्नीवर नजर ठेवण्यासाठी घरात स्पाय कॅमेरेदेखील घरात बसवून घेतले होते.
अधिकारी पत्नीचा शारीरिक आणि मानसिक छळ
घरातील या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून तो ऑफिसमध्ये गेल्यावर घरी असलेल्या पत्नीवर नजर ठेवायचा. या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून त्याने पत्नीचे अंघोळ करतानाचे व्हिडिओ रेकॉर्ड केले. हे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत ऑफिसर पत्नीचा शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात आला. त्यामुळे त्रासाला कंटाळून या महिला अधिकाऱ्याने आता पोलिसात तक्रार दाखल केली आहे. आता पोलिसांनी गुन्हा नोंदवून अधिकच्या तपासाला सुरुवात केली आहे. आता याप्रकरणी आरोपींवर काय कारवाई होते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.