साताऱ्यात कोरोनाबाधित कैदी रुग्णालयातून फरार; पोलिसांची धावाधाव

| Updated on: Apr 05, 2021 | 11:21 AM

पोलिसांच्या हातावर तुरी देऊन कैदी रुग्णालयातून फरार | Corona positive

साताऱ्यात कोरोनाबाधित कैदी रुग्णालयातून फरार; पोलिसांची धावाधाव
प्रातिनिधीक छायाचित्र
Follow us on

सातारा: राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने सर्व सरकारी यंत्रणा आणि पोलीस यंत्रणेवरील ताण वाढला आहे. अशातच आता साताऱ्यात पोलिसांच्या (Police) डोक्याचा ताप वाढवणारी घटना घडली आहे. याठिकाणी एक कोरोनाबाधित (Coronavirus) कैदी रुग्णालयातून फरार झाला आहे. आता या कैद्याला शोधण्यासाठी पोलिसांची धावाधाव सुरु आहे. (Corona positive prisoner fled away form hospital)

या प्रकारामुळे सातारा पोलिसांचाही चांगलीच नाचक्की झाली आहे. मुबारक आदिवाशी असे फरार झालेल्या कैद्याचे नाव आहे. काही दिवसांपूर्वी मुबारकरला कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्याला सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या दोन-तीन दिवसांपासून त्याच्यावर उपचार सुरु होते.

मुबारकला कोरोना बाधित असलेल्या रुग्णांच्या वॉर्डमध्ये ठेवण्यात आले होते. यावेळी मुबारक पोलिसांचा डोळा चुकवून रुग्णालयाच्या बाहेर पडला. कोविड रुग्णालयाच्या बाहेर पोलीस बंदोबस्त असूनही कैद्याने पलायन केल्यामुळे पोलिसांवर टीका केली जात आहे.

एनसीबीच्या कोठडीत असणारा एजाझ खान कोरोना पॉझिटिव्ह

ड्रग्ज रॅकेटप्रकरणी अमली नियंत्रण कक्षाकडून (NCB) अटक करण्यात आलेला अभिनेता एजाझ खान (Ajaz khan)हा कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एनसीबीच्या अधिकाऱ्यांचेही धाबे दणाणले आहे.

एनसीबीने बुधवारी एजाझ खानला अक केली होती. तेव्हापासून त्याची कसून चौकशी सुरु आहे. मात्र, यादरम्यान एजाझ खानची तब्येत बिघडली. त्यामुळे त्याची कोरोना चाचणी करण्यात आली. काल रात्री या चाचणीचा अहवाल आला. त्यामध्ये एजाझ खानला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. आता त्याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले जाणार आहे. तर दुसरीकडे याप्रकरणाचा तपास करणाऱ्या आणि गेल्या काही दिवसांपासून त्याच्या संपर्कात असलेल्या एनसीबीच्या अधिकाऱ्यांचीही कोरोना चाचणी केला जाणार आहे.

बीडमध्ये कोरोनामुळे कुंभारांवर संकट

कोरोना महामारीपासून बचाव करण्यासाठी सध्या कोमट पाण्याकडे नागरिकांचा कल आहे. तसा वैद्यकीय अधिकाऱ्यांचाही सल्ला आहे. मात्र याचा मोठा फटका मडकी तयार करणाऱ्या माजलगावच्या कुंभार समाजाला बसला आहे.

उन्हाळ्यात थंडगार पाणी पिण्यासाठी गरिबांचा फ्रीज म्हणून माठाकडे पाहिले जाते. परंतु कोरोना काळात थंड पाणी कोणीही पीत नसल्याने माठ खरेदी कडे नागरिकांनी पाठ फिरवली आहे. याचा मोठा आर्थिक फटका व्यावसायिकांना बसला आहे. व्यावसायिकांना मातीचा खर्च देखील निघणे अवघड झाले आहे.