ममता बॅनर्जी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता, शिवडी कोर्टाने दिले ‘हे’ निर्देश

| Updated on: Mar 29, 2023 | 6:47 PM

कथित राष्ट्रगीत अवमान प्रकरणी ममता बॅनर्जींच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. शिवडी न्यायालयात आज या प्रकरणी सुनावणी झाली. या सुनावणीनंतर न्यायालयाने कफ परेड पोलिसांना निर्देश दिले आहेत.

ममता बॅनर्जी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता, शिवडी कोर्टाने दिले हे निर्देश
इकबाल मिर्चीचा कथित साथीदार हारुन युसुफला जामीन
Image Credit source: Google
Follow us on

मुंबई / ब्रिजभान जैस्वार : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता दिसते. राष्ट्रगीताचा अवमान केल्याप्रकरणी कफ परेड पोलिसांनी तपास करून आपला अहवाल सादर करावा, असे निर्देश शिवडी महानगर दंडाधिकारी कोर्टाने आज दिले. सदर अहवाल कफ परेड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी 28 एप्रिलपर्यंत शिवडी महानगर दंडाधिकारी कोर्टात सादर करावा, असं निर्देश कोर्टाने दिले. आज सकाळीच मुंबई हायकोर्टाने या संदर्भात मुंबई सत्र न्यायालयाने दिलेले निर्देश कायम ठेवत ममता बॅनर्जी यांना कुठलाही दिलासा देण्यास नकार दिला होता.

हायकोर्टानेही याचिका फेटाळली

राष्ट्रगीताचा अवमान प्रकरणात ममता बॅनर्जी यांनी मुंबई सत्र न्यायालयानं दिलेल्या निकालाला हायकोर्टात आव्हान दिले होते. मात्र ममता यांना कोणताही दिलासा देण्यास मुंबई हायकोर्टाने नकार देत बुधवारी सकाळी ममता बॅनर्जी यांची याचिका फेटाळली. यानंतर दुपारी सत्र न्यायालयाच्या आदेशानुसार शिवडी न्यायालयात सुनावणी झाली.

कफ परेड पोलिसांना अहवाल सादर करण्याचे आदेश

मुंबईतील कफ परेड येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात एका सार्वजनिक कार्यक्रमादरम्यान बॅनर्जी यांनी बसलेल्या स्थितीत राष्ट्रगीत म्हणण्यास सुरुवात केली. यामुळे राष्ट्रगीताचा अवमान केल्याप्रकरणी भाजप कार्यकर्ते विवेकानंद गुप्ता यांनी कफ परेड पोलिसात तक्रार दाखल केली होती. यानंतर कारवाई न केल्याने त्यांनी शिवडी महानगर दंडाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली.

हे सुद्धा वाचा

महानगर दंडाधिकारी शिवडी यांनी ममता बॅनर्जी यांना कोर्टात हजर राहण्याचे समन्स जारी केले होते. मात्र बॅनर्जी यांनी त्यास सत्र न्यायालयात आव्हान दिले. सत्र न्यायालयाने सदर समन्स रद्द करुन नव्याने प्रकरणाची सुनावणी करण्यासाठी शिवडी दंडाधिकार्‍यांकडे परत पाठवले. शिवडी महानगर दंडाधिकारी कोर्टाने आज ममता बॅनर्जी यांच्या विरोधात दाखल तक्रारीवर आपला अहवाल 28 एप्रिलपर्यंत कोर्टात सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.