
देशाची राजधानी दिल्लीमध्ये सोमवारी, 10 नोव्हेंबरच्या संध्याकाळी झालेल्या भीषण स्फोटाने (Delhi Blast) अख्खा देश हादरला आहे. लाल किल्ल्याजवळ एका कारमध्ये झालेल्या या भीषण स्फोटात 9 जणांना जीव गमवावा लागला असून 30 पेक्षा अधिक नागरिक जखमी झाले आहेत. सुरुवातीच्या अहवालांनुसार असे म्हटले जात होते की हा आत्मघातकी हल्ला डॉ. उमर याने केला होता. हल्ल्यानंतर, त्याच्या आई आणि भावाला जम्मू आणि काश्मीरमध्ये ताब्यात घेण्यात आले. उमरच्या वहिनीची प्रतिक्रिया समोर आली आहे. उमरने त्यांना फोन करण्यापासून मनाई केली होती असं वहिनीने सांगितलं
उमर हा व्यवसायाने डॉक्टर होता. गेल्या काही दिवसांपासून देशातील विविध भागातून अनेक डॉक्टर्सना ताब्यात घेण्यात आलं होतं. त्यांच्याकडून बरंच विस्फोटक साहित्य आणि हत्यारं जप्त करण्यात आली होती. लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवणाऱ्या या मॉड्यूलशी उमरचाही संबंध असल्याचे बोलले जात आहे.
वहिनीचा मोठा खुलासा
दरम्यान डॉ. उमरचा शोध सुरू असून जम्मू-काश्मीरमध्ये त्याच्या घरातील लोकांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे. याच दरम्यान त्याच्या वहिनीची प्रतिक्रिया समोर आली आहे. संभाषणादरम्यान, उमरच्या वहिनीने खुलासा केला की तिचे शुक्रवारी उमरशी बोलणे झाले होते. तेव्हा त्याने त्याच्या आईला सांगितले की मला जास्त फोन करून त्रास देऊ नका. तो लायब्ररीमध्ये बिझी असेल असही त्याने आईला सांगितलं होता. पोलिसांनी सध्या उमरच्या आई आणि भावालाही ताब्यात घेतले आहे. त्यांच्या चौकशीतून अनेक खुलासे होऊ शकतात.
आत्महघातकी स्फोट केल्याचा संशय असलेला हा डॉ. उमर पुलवामामधील कोइल येथील रहिवासी होता. त्याने 2017 मध्ये श्रीनगरच्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस पूर्ण केले. त्याचा नोंदणी क्रमांक 15313 आहे. 24 फेब्रुवारी 1989 रोजी पुलवामा येथे जन्मलेला उमर अल फलाह वैद्यकीय महाविद्यालयात डॉक्टर होता. स्फोटाच्या आधीपासूनच पोलीसांकडून त्याचा कसून शोध घेण्यात येत होता.
शाहीनाला जबाबदारी काय ?
फरिदाबाद मॉड्यूलमध्ये अटक केलेल्या डॉ. शाहीनाला जैश दहशतवादी संघटनेची महिला शाखा स्थापन करण्याचे आणि भारतात भरती करण्याचे काम सोपवण्यात आले होते. जमात उल मोमिनत ही जैशची महिला शाखा आहे आणि डॉ. शाहीनाकडे भारतात त्याची कमान सोपवण्यात आली होती. सादिया अझहर ही पाकिस्तानातील जैशच्या महिला शाखेची प्रमुख मसूद अझहरची बहीण आहे. सादिया अझहरचा पती युसूफ अझहर हा कंधार विमान अपहरणातील मास्टरमाइंड होता.