पुजारी बनून आला… झोळीत एक कोटी किंमतीचा कलश टाकला अन् फरार झाला; सर्वात मोठ्या चोरीने लालकिल्ल्यात खळबळ

One Crore Kalash Stolen : दिल्लीत एक मोठे अक्रीत घडले आहे. चोरट्यांनी जैन समाजाच्या धार्मिक कार्यक्रमातून एक कोटी रुपये मुल्य असलेला कलश चोरल्याची घटना घडली आहे. या घटनेने पोलिसांच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. काय आहे अपडेट?

पुजारी बनून आला... झोळीत एक कोटी किंमतीचा कलश टाकला अन् फरार झाला; सर्वात मोठ्या चोरीने लालकिल्ल्यात खळबळ
lal killa
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Sep 06, 2025 | 3:44 PM

दिल्लीतील लाल किल्ला परिसरात मंगळवारी एक जबरी चोरी झाली. चोरट्यांनी एक कोटी रुपयांचा कलश चोरी केला. लाल किल्ला परिसरात जैन समाजाचे एक धार्मिक अनुष्ठान सुरू होते. सगळे जण धार्मिक कार्यक्रमात व्यग्र असतानाच चोरांनी 760 ग्रॅम सोने,150 ग्रॅम हिरे, माणिक मोती, पन्ना यांनी मढवलेल्या कलशावर हात साफ केला. त्यांनी अशी हात की सफाई दाखवली की कलश चोरीनंतर बराच वेळ अनेकांची ही घटना लक्षात सुद्धा आली नाही. पण त्यानंतर कलश न दिसल्याने खळबळ उडाली. तर येथील सुरक्षा व्यवस्थेवरून आता प्रश्न उपस्थित होत आहे. तात्काळ पोलिसांनी तपासाला सुरूवात केली आहे.

पोलिसांनी सुरू केला तपास

दिल्ली येथील लाल किल्ला परिसरात जैन समाजाचे हे धार्मिक अनुष्ठान सुरू होते. या कार्यक्रमासाठी विविध रत्नआभुषणांनी, सोन्याने मढवलेला कलश ठेवण्यात आला होता. त्याची बाजारातील किंमत एक कोटींच्या घरात होती. सर्वच जण धार्मिक कार्यक्रमात व्यग्र होते. काहींची पूजेची लगबग सुरू होती. त्यावेळी चोरट्यांनी संधी साधली. त्यांनी हा कलश चोरला. हा कलश 760 ग्रॅम सोने, हिरे, माणिक मोती आणि पन्ना यांनी मढवलेला होता. पोलिसांना चोरीच्या घटनेची माहिती देण्यात आली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी या परिसरात लावलेले सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात काही व्यक्तींच्या हालचाली संशयास्पद आढळल्या. पोलिसांनी या व्यक्तींची ओळख पटवल्याचे समोर येत आहे. पोलिसांनी आयोजक आणि जैन समुदायाला या चोरांना लवकरच पकडण्याचे आश्वासन दिले. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता, 2023 अंतर्गत 303(2) अंतर्गत गुन्हा दाखल केला.

स्वागत कार्यक्रमातच साधली संधी

लाल किल्ला परिसरात हे धार्मिक अनुष्ठान सुरु होते. येथे हा कोट्यवधींचा कलश पण ठेवण्यात आला होता. व्यापारी आणि व्यावसायिक सुधीर जैन हे रोज पूजा करून हा कलश या कार्यक्रमात घेऊन येतात. मंगळवारी या कार्यक्रमाला अनेक मोठ्या राजकीय नेत्यांनी भेट दिली. त्यांच्या स्वागत कार्यक्रमात आयोजक व्यग्र झाले. त्याचवेळी संधी साधत चोरट्यांनी कलश चोरला. जैन समुदायाकडून हा कार्यक्रम 15 ऑगस्ट पार्कमध्ये सुरू आहे. तो 9 सप्टेंबर रोजी संपणार आहे. त्यापूर्वीच चोरट्यांनी असं कांड केलं आहे. सीसीटीव्हीत चोरटे कैद झाले आहेत. त्यांची ओळख पटवण्यात आली आहे. लवकरच ते अटकेत असतील आणि कलशही ताब्यात येईल असा पोलिसांचा दावा आहे.