बापच बनला वैरी… मुलीचा खून, मृतदेहाच्या बाजूला हळद कुंकू… धक्कादायक प्रकाराने धाराशिवकर हादरले
धारशिवच्या परांडा तालुक्यातील शेळगाव येथे एका वडिलांनी आपल्या 9 वर्षीय मुलीची दारूच्या नशेत हत्या केली. आरोपी ज्ञानेश्वर जाधव याने मुलीच्या मृतदेहावर हळदीकुंकू टाकले होते. पोलिसांनी त्याला अटक केली असून गुन्हा दाखल केला आहे. मुलीची आई लहानपणीच सोडून गेली होती. आरोपीने आजीला धमकी देऊन ही घटना लपवण्याचा प्रयत्न केला होता.

आपल्या मुलांना मोठ करण्यासाठी आई-वडील दोघेही काबाडकष्ट करतात, त्यांना सुरक्षित राखण्यासाठी जीवाचा कोट करतात. पण बापच मुलांसाठी काल ठरला तर ? धाराशिवच्या परांडा तालुक्यात असंच काहीस घडलं आहे, ज्यामुळे सगळेच हादरले आहेत. परंडा तालुक्यातील शेळगाव येथे एका इसमाने दारूच्या नशेत असतानाच अवघ्या 9 वर्षांच्या मुलीची हत्या केलीय एवढंच नव्हे तर तिच्या मृतदेहाच्या आजूबाजूला हळदीकुंकू टाकण्याचा धक्कादायक प्रकारही घडला असून सगळेच अवाक् झाले. धारदार शस्त्राने मुलीवर वार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या बापाला, त्या आरोपीला पोलिसांनी अटक केली असून त्याच्या विरोधात आंबी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गौरी जाधव असे मृत मुलीचे नाव असून ती चौथ्या इयत्तेत शाळेत शिकत होती. तर ज्ञानेश्वर जाधव असे आरोपी वडिलांचे नाव आहे. वडीलांनी गौरीची कुऱ्हाडाचे वार करून निर्घृणपणे हत्या केली. ज्ञानेश्वर जाधव याला दारूचे व्यसन होते, त्यामुळे त्याची मुलगी गौरी ही तिच्या आजीकडे रहात होती. मात्र दारूच्या नशेमुळेच घात झाला आणि ज्ञानेश्वरने पोटच्या पोरीचा जीव घेतला.
आजीला दिली धमकी
तसेच हे प्रकरण दडपण्यासाठी त्याने प्रयत्न केला आणि मुलीला मारलं हे कोणालाही सांगू नकोस अशी धमकीही ज्ञानेश्वरने गौरीच्या आजीला दिली होती. पण मुलीला मारल्यानंतर त्याने मृतदेहाच्या कडेला हळदीकुंकू का टाकलं ? तसेच त्याने पोटच्या लेकीची हत्या नेमकी का, कोमत्या कारणामुळे केली हे समजू शकलेले नसून पोलीस अद्यार त्याप्रकरणी कसून तपास करत आहेत.
मृत गौरी ही लहान असतानाच तिची आई तिला सोडून गेली होती, तेव्हापासूनच तिच्या आजीनेच तिचा सांभाळ केला. मात्र आता त्याच नातीची हत्या झाल्याने आजीच्या दु:खाला पारावार उरला नसून तिच्या शोकामुळे गावकरीही हळहळले आहेत. ज्ञानेश्वरला दारूचे व्यसन असून त्याचे नेहमी घरात खटके उडत होते. याच रागातून त्याने हे भयानक कृत्य केले असावे, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. आंबी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.
