जेवण सांडवल्यावरुन वाद विकोपाला गेला अन् शेवटी त्याने मित्राचा घात केला, डोंबिवलीत नेमकं काय घडलं?
गौरव जगत असे मृत व्यक्तीचे नाव असून जयसान मांझी असे आरोपीचे नाव आहे. हे दोघेही ओडिसाचे राहणारे असून डोंबिवलीमध्ये एका नव्या इमारतीत मजूर म्हणून काम करत होते. सध्या या प्रकरणात विष्णूकर पोलिसांनी गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे

गेल्या काही दिवसांपासून राज्यात गुन्हेगारीसंदर्भातील घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यातच आता डोंबिवलीत केवळ जेवण सांडविण्यावरून दोन मजुरांमध्ये वाद झाला आणि त्याचा शेवट थेट हत्येत झाला. एका मजुराने दुसऱ्या मजुराच्या डोक्यात बांबू टाकून झोपेतच त्याची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ही घटना डोंबिवलीतील पंडित दिनदयाळ रोडवरील इमारत बांधकामाच्या ठिकाणी घडली. यानंतर पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक केली आहे. गौरव जगत असे मृत व्यक्तीचे नाव असून जयसान मांझी असे आरोपीचे नाव आहे. हे दोघेही ओडिसाचे राहणारे असून डोंबिवलीमध्ये एका नव्या इमारतीत मजूर म्हणून काम करत होते. सध्या या प्रकरणात विष्णूकर पोलिसांनी गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे
नेमकं प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार डोंबिवली पश्चिमेतील पंडित दिनदयाळ रोड येथे एका नव्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. या ठिकाणी काम करणाऱ्या मजुरांमध्ये जेवण सांडल्याच्या क्षुल्लक कारणावरून वाद झाला. यानंतर या वादाचे रुपांतर हत्येत झाले. ओडिशातील एका गावातून आलेले हे मजूर नेहमीप्रमाणे संध्याकाळी एकत्र जेवण बनवत होते. गुरुवारी रात्री जेवण बनवत असताना काही अन्न सांडले. यामुळे गौरव जगत आणि जयसान मांझी यांच्यात वाद झाला. इतर मजुरांनी हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. यानंतर सर्व मजूर झोपण्यासाठी निघून गेले.
पण गौरव जगत आणि जयसान मांझी ज्यांच्यात हा वाद झाला, ते दोघे इमारतीच्या खालच्या मजल्यावर झोपले होते. रात्रीच्या काळोखात या वादाचा राग मनात धरून जयसान मांझीने गौरव जगत जवळच पडलेल्या बांबूच्या सहाय्याने त्याच्यावर हल्ला केला. गौरववर झोपेत हा हल्ला झाल्याने त्याला प्रतिकार करता आला नाही. त्याचा जागीच मृत्यू झाला.
डोंबिवलीतील मजूर वसाहतींमध्ये भीतीचे वातावरण
या घटनेनंतर इतर मजुरांनी तातडीने पोलिसांना याबद्दलची माहिती दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह पुढील तपासणीसाठी शास्त्रीनगर हॉस्पिटलला पाठवला आहे. विष्णूनगर पोलिसांनी या प्रकरणी खूनाचा गुन्हा दाखल करत आरोपी जयसान मांझी याला अटक केली आहे. या हत्येने डोंबिवलीतील मजूर वसाहतींमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.