Badlapur Firing : बदलापुरात पोलिसांना खबर दिल्याच्या रागातून गोळीबार, आरोपींमध्ये शिवसेनेच्या दोन पदाधिकाऱ्यांचा समावेश

| Updated on: Aug 28, 2022 | 10:27 PM

यातील आरोपी अमन सिंग याचा भाऊ अभिषेक सिंग याच्यावर 2017 साली अवैधरित्या गावठी कट्टा बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. त्यावेळी कैफ मन्सूर शेख यानेच पोलिसांना याबाबतची खबर दिल्याचा संशय आणि राग अमन सिंग याला होता.

Badlapur Firing : बदलापुरात पोलिसांना खबर दिल्याच्या रागातून गोळीबार, आरोपींमध्ये शिवसेनेच्या दोन पदाधिकाऱ्यांचा समावेश
बदलापुरात पोलिसांना खबर दिल्याच्या रागातून गोळीबार
Image Credit source: TV9
Follow us on

बदलापूर : गावठी कट्टा बाळगल्याची खबर पोलिसांना दिली, या रागातून एकावर गोळीबार (Firing) करण्यात आल्याची घटना बदलापूरमध्ये घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी हत्येच्या प्रयत्ना (Attempt to Murder)चा गुन्हा दाखल करत चौघांना बेड्या ठोकल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे आरोपींमध्ये शिवसेनेच्या दोन पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. अमन सिंग, सचिन खंडागळे, राजेश पाठक आणि शेखर गडदे यांना अशी अटक (Arrest) करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत. अन्य आरोपी फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे यातील अमन सिंग आणि लक्ष्मण नवगिरे हे शिवसेनेचे सक्रिय कार्यकर्ते आहेत.

पोलिसांना खबर दिल्याच्या रागातून पाच वर्षांनी हल्ला

अमन सिंग हा शिवसेनेच्या माथाडी कामगार सेनेचा ठाणे जिल्हा सचिव आहे. तर लक्ष्मण नवगिरेच्या पत्नीकडे शिवसेना महिला आघाडी उपविभाग संघटक पद असून त्या शिवसेनेकडून आगामी निवडणुकीत इच्छुक उमेदवार आहेत. तर त्याच्या सख्ख्या भावाकडे शिवसेनेचं शाखाप्रमुख पद आहे. यातील आरोपी अमन सिंग याचा भाऊ अभिषेक सिंग याच्यावर 2017 साली अवैधरित्या गावठी कट्टा बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. त्यावेळी कैफ मन्सूर शेख यानेच पोलिसांना याबाबतची खबर दिल्याचा संशय आणि राग अमन सिंग याला होता. त्यातूनच 5 वर्षांनी कैफ तावडीत सापडल्याचं पाहून या सर्वांनी त्याच्यावर हल्ला केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मात्र या प्रकरणामुळे बदलापूर शहरातली गुन्हेगारी आणि त्यात राजकीय पदाधिकाऱ्यांचा सहभाग हे पुन्हा एकदा समोर आलं आहे.

पीडिताला रॉडने मारहाण करत जीवे मारण्यासाठी पाठलाग केला

बदलापूर गाव परिसरात राहणारे फिर्यादी कैफ मन्सूर शेख हे रविवारी मध्यरात्री बदलापूर गाव परिसरातून त्यांच्या क्रेटा कारने घरी जात होते. यावेळी अमन सिंग, सचिन खंडागळे, राजेश पाठक, शेखर गडदे, राऊत्या, लक्ष्मण नवगिरे आणि अन्य 3 ते 4 अनोळखी इसमांनी त्यांना बदलापूर गावाजवळ असलेल्या ठाकूरवाडी जवळ अडवलं आणि त्यांच्यावर हल्ला चढवला. कैफ मन्सूर शेख यांची गाडी रॉडने फोडून त्यांनाही रॉडने मारहाण करण्यात आली. यानंतर ते जीव वाचवण्यासाठी पळून जात असताना तलवार घेऊन त्यांना जीवे मारण्यासाठी त्यांचा पाठलाग करण्यात आला. तसंच राजेश पाठक याने त्याच्याकडे असलेल्या परवानाधारक रिव्हॉल्व्हरमधून गोळीबार केला. या घटनेनंतर कैफ मन्सूर शेख यांनी बदलापूर पश्चिम पोलीस स्टेशन गाठत तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी सर्व आरोपींविरोधात हत्येचा प्रयत्न आणि भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. यापैकी अमन सिंग, सचिन खंडागळे, राजेश पाठक आणि शेखर गडदे यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. तर राऊत्या, लक्ष्मण नवगिरे आणि अन्य 3 ते 4 जण अद्याप फरार आहेत. त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता गावडे यांनी दिली. (Firing and an attempt to kill a man from over old dispute in Badlapur)

हे सुद्धा वाचा