
एका सराईत गुंडाने आपल्या मित्राच्याच गळ्यावर चाकूने वार करुन त्याची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास सांगलीच्या खानापूर येथील विजापूर-गुहागर मार्गावरील हजारे हॉस्पिटल शेजारी घडली आहे. मृत जयंत भगत याच्या खूनाप्रकरणात सराईत गुंड जावेद मुबारक अत्तार याला अटक केली आहे.
मृत जयंत विश्वास भगत ( वय ४० ) हा ट्रॅव्हल्सवर क्लीनर म्हणून काम करतो. घटनेच्या दिवशी तो ट्रॅव्हल्सवर होता. त्याला रस्त्यात अडवून जावेद मुबारक अत्तार ( वय ४० ) याने अडवले. आणि त्याच्याशी भांडण करुन त्याच्यावर गळ्यावर चाकूने वार केले. जयंत विश्वास भगत याला जखमी अवस्थेत रुग्णालयात पादचाऱ्यांनी दाखल केले. परंतू रक्तस्राव जास्त झाल्याने त्याचा मृत्यू झाला. घटनेनंतर जावेद मुबारक अत्तार हा घटनास्थळावरुन पळून गेला होता. त्याला नंतर पोलिसांनी अटक केली आहे.
घटनेनंतर आरोपी जावेद हा फरार झाला होता. त्याच्या शोधासाठी पोलीस उपनिरीक्षक विशाल येळेकर यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार करण्यात आले होते. उपविभागीय अधिकारी विपुल पाटील आणि निरीक्षक धनंजय फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीची शोध मोहिम सुरू होती. दरम्यान, जावेद मुबारक अत्तार हा गुंड प्रवृत्तीचा असून आधीही त्याच्यावर मेहुण्यावर हल्ला केल्याच्या प्रकरणात गुन्हा दाखल झाला होता.मेहुण्यावर केलेल्या हल्ल्याप्रकरणी अत्तार अटकेत होता. जामिनावर बाहेर आल्यानंतर त्याने पुन्हा खून केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
जावेद याचा फोन खराब झाल्याने त्याने जयंतकडून एक मोबाईल फोन वापरायला घेतला होता. बरेच वेळा मागून अत्तार याने त्याचा फोन परत केला नव्हता. त्यामुळे जयंत याने त्याच्या घरी जाऊन फोन मागून आणला याचा त्याला राग आला होता. त्यामुळे त्याने त्याचा जाब विचारुन झालेल्या भांडणात जयंत याच्या गळ्यावर वार केल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे म्हटले जात आहे. या घटनेनंतर आरोपीला अत्तार याला विटा न्यायालयात हजर केले. न्यायालयाने जावेद अत्तार याला दोन दिवसांची पोलीस कस्टडी दिली आहे.या प्रकरणाचा अधिक तपास विटा पोलीस करीत आहेत