
भाजप मंत्री पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांची पत्नी गौरी पालवे-गर्जे (Gauri Garje) यांच्या मृत्यू प्रकरणात रोज नवनवी माहिती समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी वरळी येथील फ्लॅटमध्ये गौरी यांनी गळफास लावून आत्महत्या केली असा दावा तिच्या पतीने केला होता. त्यामुळे प्रचंड खळबळ माजली. त्यांच्या लग्नाला अवघे 10 महिनेच झाले होते, तेवढ्यातच गौरी यांनी टोकाचं पाऊल उचलल्याने सर्वांना धक्का बसला. मात्र तिच्या कुटुंबियांना घातपाताच संशय असून आमची लेक, गौरी असं करूच शकत नाही. तिची आत्महत्या नाही तर एकट्याने नाही तर या दोघातिघांनी गळा दाबून तिला मारलं असा आरोप गौरीच्या आई-वडिलांनी केला आहे.
याप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया याही आक्रमक झाल्या असून त्यांनी हे प्रकरण लावून धरलं आहे. आज माध्यमांशी संवाद साधताना अंजली दमानिया आणि गौरीचे कुटुंबीय यांनी अनेक आरोप केले. मुलीची आत्महत्या नव्हे तर तिचा खून झालाय, गळा दाबून मारलं असा पुनरुच्चार त्यांनी केला.
काय म्हणाल्या अंजली दमानिया ?
मला कोणत्याही राजकारणात पडायचं नाही, पण फॅक्ट्स मांडणं गरजेचं आहे. गौरीचा मृत्यू झाला, तेव्हा वरून ओढणी, दुपट्टा काढलेला होता, तो खाली पडला होता. दुसरा मुद्दा म्हणजे ज्यावेळेस फॉरेन्सिक टीम चौकशीला पोहोचली तेंव्हा सुभाष केकन नावाचा मावस भाऊ आतमध्ये काय करत होता ? फॉरेन्सिक टीम तपासणी करत होती तेंव्हा त्याचा संबंध काय ? असा सवाल दमानिया यांनी उपस्थित केला. जेव्हा गौरी वर पंख्याला लटकली होती तेव्हा त्याने गळ्याच्या भोवतीची गाठ सोडणे अपेक्षित होत पण त्याने पंख्याच्या वरची गाठ पण सोडली होती हे कस शक्य आहे ? असंही त्या म्हणाल्या. तिसरा मुद्दा म्हणजे मी (अंजली दमानिया) आणि तिचे आई वडील जेव्हा नायरमध्ये मॉर्च्युरीमध्ये गेलो होतो, तेव्हा तिच्या अंगावर उजव्या बाजूला सगळ्या जखमा होत्या, पण पोलिसांच्या फोटोमध्ये ते नाहीये. अनेक हॉरिबल गोष्टी सुरू असून या प्रकरणात राजकीय दबाव आहे असा आरोप दमानिया यांनी केला. न्याय सर्वांना समान असेल तर तो गौरीला आणि तिच्या कुटुंबियांना मिळाला पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली.
गौरीची आत्महत्या नाहीच
आमची मुलगी, गौरी असं करूच शकत नाही, मग तिने आत्महत्या केली असंच सगळीकडे का चालवलं जात आहे असा सवाल वडिलांनी विचारलां. तिच्या मृत्यूचं खर कारण शोधून ते चालवा ना. मीडियाला माझी बाप म्हणून कळकळीची विनंती आहे, असं गौरीचे वडील म्हणाले. त्याला (अनंत गर्जे) न्यायालयीन कोठडी व्हायलाच नको होती, तो पोलीस कोठडीत हवा होता. परदेशातून आरोपी आणता येतो इथले आरोपी का सापडत नाहीत, असा सवाल तिच्या वडिलांनी विचारला. या प्रकरणात फक्त अनंत नव्हे तर त्याची बहीण आणि भाऊ यांनाही अटक व्हायला हवी. आम्ही ओरडून ओरडून सांगतोय की एकट्याने नाही तर या दोघातिघांनी गळा दाबून गौरीला मारलं आहे, असे म्हणत त्यांनी अनेक आरोप केले.