Elvish Yadav : ‘बिग बॉस ओटीटी 2’चा विजेता एल्विश यादवकडून खंडणी मागणाऱ्याला अखेर अटक , गुजरातमध्ये ठोकल्या बेड्या

आरोपी हा एल्विश यादवच्या लाईफस्टाइलमुळे खूप प्रभावित झाला. लहान वयातच झटपट पैसे मिळवण्याच्या मोहापायी त्याने हे पाऊल उचलत खंडणीचा कॉल केला.

Elvish Yadav :  ‘बिग बॉस ओटीटी 2’चा विजेता एल्विश यादवकडून खंडणी मागणाऱ्याला अखेर अटक , गुजरातमध्ये ठोकल्या बेड्या
| Updated on: Oct 26, 2023 | 12:49 PM

गुरूग्राम | 26 ऑक्टोबर 2023 : ‘बिग बॉस ओटीटी 2’चा ( Big Boss OTT 2 winner) विजेता एल्विश यादव (Elvish yadav) हा सध्या चर्चेत आहे. अज्ञात व्यक्तीने कॉल करून त्याच्याकडे एक कोटी रुपयांची खंडणी (extortion call) मागितली होती. याप्रकरणी त्याने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. अखेर आता या खंडणीखोराला गुरूग्राम पोलिसांनी अटक केल्याची माहिती समोर आली आहे. ANI च्या वत्तानुसार, गुरूग्राम पोलिसांनी याप्रकरणातील आरोपीला गुजरातमधून बेड्या ठोकल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, एल्विश यादव याला एक फोन आला होता. समोरून बोलणाऱ्या व्यक्तीने त्याला धमकी देत एक कोटी रुपयांची मागणी केली. याप्रकरणी 25 ऑक्टोबर रोजी एल्विश याने गुरुग्राम पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली. अखेर याप्रकरणातील आरोपीला गुजरातमधून अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले.

‘ बिग बॉसचा विजेता आणि यूट्यूब इन्फ्लुएन्सर असलेल्या एल्विश यादवने २५ ऑक्टोबर रोजी पोलिसांत तक्रार दाखल केली. १७ ऑक्टोबरच्या आसपास त्याला धमकीचे काही कॉल आणि मेसेजस आले. त्याद्वारे त्याच्याकडे आधी ४० लाख रुपये आणि नंतर १ कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली’ असे पोलिसांनी सांगितले.

त्यानंतर गुडगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि तपासासाठी एक टीम स्थापन करण्यात आली. या केसमध्ये गुजरात पोलिसांकडूनही बरीच मदत मिळाली, असे पोलिसांनी नमूद केले. खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, खंडणीच्या या कॉलप्रकरणी पोलिसांनी गुजरातच्या वडनगर येथून एक संशयिताला अटक केली. शाकीर मकरानी ( वय २४) हा आरोपी वडनगरचा रहिवासी असून तो आरटीओ एजंट म्हणून काम करतो.

एल्विश यादवचा लोकांवर खूप प्रभाव आहे. आरोपीही त्याच्या लाईफस्टाइलमुळे खूप प्रभावित झाला. लहान वयातच सोप्या मार्गाने भरपूर पैसा मिळवण्याची आरोपी इच्छा होती. आणि त्याच इच्छेपायी त्याने एल्विश यादवचा नंबर मिळवून त्याला खंडणीसाठी धमकीचा कॉल आणि मेसेज केला, असे पोलिसांनी सांगितले.

 

बिग बॉस ओटीटीच्या दुसऱ्या सिझनचा विजेता बनण्याआधीपासून एल्विश यादव हा युट्यूबवर लोकप्रिय आहे. सोशल मीडियावर त्याचा मोठा चाहतावर्ग आहे. याच कारणामुळे तो बिग बॉस ओटीटीचा विजेता ठरला. विजेतेपद जिंकल्यानंतर त्याच्यावर मोठमोठ्या ऑफर्सचा वर्षाव झाला. युट्यूबवर एल्विशचे व्लॉग्स खूप लोकप्रिय आहेत. त्याला लाखोंमध्ये व्ह्यूज मिळतात. 2016 मध्ये एल्विशने युट्यूब चॅनल सुरू केलं. त्यावर तो विविध व्हिडीओ पोस्ट करत राहिला. पाहता पाहता तो प्रसिद्ध युट्यूबर बनला आणि आज तो कोट्यवधींचा मालक आहे. त्याच्याकडे आलिशान आणि अत्यंत महागड्या गाड्यांचं कलेक्शनही आहे.