व्हिडीओ कॉलवरून बायकोला घाबरवायला गेला अन् एका झटक्यात… तरुण जीम ट्रेनरबाबत काय घडलं?
कुणाला कधी मृत्यू येईल याची काही शाश्वती नसते. कधी कधी आपण मस्करी करायला जातो, एखाद्याला घाबरवण्यासाठी जीवावर बेतणारी गोष्ट करायला जातो आणि त्यातच होत्याचं नव्हतं होतं. कर्नाटकातील बंगळुरूमध्ये एका जीम ट्रेनरच्या बाबत असंच झालं आहे. पत्नीला घाबरवायला गेला अन् एका झटक्यात...
कर्नाटकाची राजधानी बेंगळुरूमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. बागलगुंटे पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही खळबळजनक घटना गडली आहे. नवऱ्याने आधी बायकोला फोन केला. नंतर गळ्यात फाशीचा दोर अडकवला. तिला घाबरवण्यासाठी हा प्रकार सुरू होता. पण दुर्देव आड आलं. बायकोला धमकी देता देता दोर अधिक घट्ट झाल्याने त्याला फाशी बसली आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. मृत तरूण हा बिहारचा राहणारा आहे. तो बंगळुरूमध्ये जीम ट्रेनर म्हणून काम करत होता. दरम्यान, पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केला असून अधिक तपास करत आहेत.
अमित कुमार असं या तरुणाचं नाव आहे. तो 28 वर्षाचा आहे. दहा वर्षापूर्वी नोकरीच्या शोधात तो बंगळुरूला आला होता. बंगळुरूत जॉब करता करता जीमलाही जाऊ लागला. जिममध्येच तो जीम ट्रेनरही बनला. एक वर्षापूर्वी जीममध्ये त्याची एका मुलीशी मैत्री झाली. मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं अन् दोघांनी लग्नही केलं. सुरुवातीला अमितच्या आईवडिलांनी लग्नाला नकार दिला. त्यानंतरही त्याने या मुलीशी विवाह केला होता.
घर सोडून गेली
लग्नानंतर अमितची पत्नी नर्सिंग कोर्स करू लागली. त्यामुळे ती दुसरीकडे राहत होती. त्यामुळे ती नवऱ्याला अधिक वेळ देऊ शकत नव्हती. ती नेहमी तिच्या मित्रांशी फोनवर गप्पा मारायची. त्यामुळेच अमितचं आणि तिचं सारखं वाजायचं. रोजच्या या भांडणाला वैतागून त्याची बायको घर सोडून निघून गेली होती.
शेवटचा व्हिडीओ कॉल
अमित वारंवार तिला फोन करून घरी यायला सांगत होता. पण ती ऐकायला तयार नव्हती. त्यामुळे अमित अधिक त्रस्त झाला होता. गेल्या बुधवारी त्याने बायकोला व्हिडीओ कॉल केला. पत्नीने घरी यावं म्हणून त्याने एक युक्ती केली. त्याने गळफास लावत असल्याचं व्हिडीओ कॉलमधून दाखवलं. तू घरी आली नाहीस तर मी जीव देईन असं तो तिला वारंवार व्हिडीओ कॉलवर बोलत होता.
आईवडिलांचे रडून रडून हाल
गळ्यात दोर घालून पत्नीला धमकावत असतानाच अचानक दोर टाईट झाला अन् त्याला फाशी बसली. त्यातच त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. त्यानंतर अमितचा मृतदेह त्याच्या कुटुंबीयांना सुपुर्द केला. या घटनेची माहिती मिळताच त्याचे कुटुंबीय बंगळुरूला आले. मुलाचा मृतदेह पाहून कुटुंबाने एकच टाहो फोडला. त्याच्या आईवडिलांचे रडून रडून प्रचंड हाल झाले होते.