साहेब न्याय द्या, जातीयवादाचा आरोप करत त्यानं जीव दिला, मुख्यमंत्र्यांसाठी शेवटचे शब्द…

मंदिरात काम करत असतांना पदाधिकारी जातीवरुन त्रास देतात तसेच मंदिरात गैरपद्धतीची कामे करतात, असा आरोप आत्महत्याग्रस्त व्यक्तीने पत्रातून केला आहे.

साहेब न्याय द्या, जातीयवादाचा आरोप करत त्यानं जीव दिला, मुख्यमंत्र्यांसाठी शेवटचे शब्द...
हिंगोलीत मंदिर सेवेकऱ्याची आत्महत्या
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Sep 14, 2022 | 4:08 PM

हिंगोलीः अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्याने (Farmer) मुख्यमंत्र्यांना रक्ताने पत्र लिहिल्याची घटना कालच घडली. हिंगोलीतील (Hingoli) शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांना हे पत्र लिहिलं होतं. आता याच जिल्ह्यातून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जातीय वादाला कंटाळून आत्महत्या (Suicide) केल्याचं प्रथमदर्शनी समोर येतंय.   आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीने जीवन संपवण्याचं कारण सांगताना सहकाऱ्यांवर गंभीर आरोप केलेत. तसंच अखेरच्या क्षणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाने पत्रही लिहून ठेवलंय. मंदिरातील जातीयवाद संपुष्टात आणा, साहेब न्याय द्या, अशी मागणी सदर व्यक्तीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्रातून केली आहे. या घटनेने गावात खळबळ माजली आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

हिंगोली तालुक्यातील देवी घोटा इथल्या तुळजादेवी मंदिर संस्थानच्या सेवेकऱ्याने आत्महत्या केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या नावाने पत्र लिहून मंदिरातील भोजन कक्षात गळफास घेऊन त्याने जीवन संपवलं.

हिंगोली तालुक्यात देवी घोटा तुळजाभवानी हे भाविकांचे मोठे श्रद्धास्थान म्हणून ओळखले जाते. नवरात्रीच्या काळात येथे नेहमीच गर्दी होत असते. या मंदिरात सेवेकरी म्हणून वंश परंपरेने जगताप कुटुंब कार्यरत आहे.

रोजसारखे आज सकाळी गजानन जगताप (गुरव) आणि त्यांच्या पत्नी मंदिराच्या साफसफाईसाठी गेले होते. पत्नी बाहेरच्या भागात झाडझूड करत असताना गजानन याने आतील भोजन कक्षात गळफास घेतला.

बराच वेळ झाल्यानंतरही पती बाहेर येत नसल्याचं पाहून गजानन यांच्या पत्नीने आत जाऊन पाहिलं. गजानन यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.

घटनेची माहिती मिळताच नर्शी पोलीस ठाण्याचे पथक मंदिरात हजर झाले. घटनास्थळाची पाहणी केली असता, तिथे मुख्यमंत्र्यांच्या नावे चिठ्ठी आढळून आली.

या पत्रात मंदिराचे कार्याध्यक्ष राजाभाऊ देशमुख आणि संस्थानच्या इतर पदाधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचं म्हटलं आहे.

मंदिरात काम करत असतांना पदाधिकारी जातीवरुन त्रास देतात तसेच मंदिरात गैरपद्धतीची कामे करतात, असा आरोप करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री साहेब..! मंदिरातील जातीय आणि ब्राम्हणवाद संपुष्टात आणवा.. माझ्या मृत्यूला राजाभाऊ देशमुख, व्यंकटेश देशमुख, तसेच किरण नर्शीकर,आनंद पांडे, आणि भवानीदास देशपांडे जबाबदार आहेत. प्रकरणाची सखोल चौकशी करून मला न्याय द्यावा…! असे या चिठ्ठीत लिहिले आहे.

पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.