रात्रीच्या अंधारात डोळ्यात टाकलं फेविक्विक, 8 विद्यार्थ्यांची जीवाच्या आकांताने तडफड; शाळेत खळबळ!

एका शाळेतील वसतीगृहात धक्कादायक प्रकार घडला आहे. एका विद्यार्थ्याने इतर विद्यार्थ्यांच्या डोळ्यात चक्क फेविक्विक टाकल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर सगळीकडे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

रात्रीच्या अंधारात डोळ्यात टाकलं फेविक्विक, 8 विद्यार्थ्यांची जीवाच्या आकांताने तडफड; शाळेत खळबळ!
fevi kwik in eye
| Updated on: Sep 13, 2025 | 7:12 PM

Fevi Kwik News : शालेय जीवनात झालेले मित्र आयुष्यभर आपल्यासोबत असतात. पण हेच शालेय मित्र शाळेत असताना कधी कधी अतिशय विचित्र असा प्रकार करून जातात ज्याचा परिणाम अनेकांना आयुष्यभर भोगावा लागतो. सध्या शाळेतील असाच एक गंभीर प्रकार समोर आला आहे. इथे एका विद्यार्थ्याने आपल्या मित्रांच्या डोळ्यात चक्क फेविक्विक टाकले आहे. यामुळे तब्बल 8 विद्यार्थी जखमी झाले आहेत.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार ही घटना ओडिसा राज्यातील कंधमाल जिल्ह्यातील फिरिंगिया तालुक्यातील एका शाळेत घडला आहे. या शाळेचे वसतिगृहदेखील आहे. या वसतीगृहात रात्री झोपलेल्या आठ विद्यार्थ्यांसोबत हा प्रकार घडला आहे. याच वसतीगृहातील एका विद्यार्थ्याने आपल्यासोबतच्या अन्य विद्यार्थ्यांच्या डोळ्यात फेविक्विक टाकले आहे. आपले डोळे उघडत नसल्याने हे विद्यार्थी हैरान झाले. त्यानंतर हा गंभीर प्रकार समोर आला. ही घटना घडली त्या शाळेचे नाव सेबाश्रम स्कुल असे आहे.

विद्यार्थांना दाखल केलं रुग्णालयात

डोळ्यात फेविक्विक टाकल्यानंतर या आठ विद्यार्थ्यांना काहीच दिसत नव्हते. त्यानंतर हे विद्यार्थी घाबरून इकडे-तिकडे पळत होते. यात हे सर्व विद्यार्थी जखमी झाले. तसेच त्यांच्या डोळ्यांनाही इजा झालेली आहे. मुलांच्या डोळ्यात फेविक्विक टाकल्याचे समोज येताच त्या विद्यार्थ्यांना गोछापडा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र विद्यार्थ्यांची परिस्थिती लक्षात घेता लगेच त्यांना फुलबानी येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आरे. सध्या डॉक्टरांची एक टीम या विद्यार्थ्यांवर उपचार करत आहे. सध्या सात विद्यार्थ्यांवर रुग्णालयात उपचार केला जात आहे. तर उर्वरित एका विद्यार्थ्याची प्रकृती चांगली असल्याने त्याला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

डॉक्टरांनी नेमकं काय सांगितलं?

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार या दुर्घटनेत विद्यार्थ्यांच्या डोळ्यांचे थोडेफार नुकसान झालेले आहे. वेळेवर उपचार मिळाल्याने या गंभीर परिणाम झाले नाही. सध्या हे विद्यार्थी डॉक्टरांच्या निगराणीखाली असणे गरजेचे आहे, असे डॉक्टरांनी सांगितले आहे.

मुख्याध्यापकांचे निलंबन

दरम्यान, हा धक्कादायक प्रकार घडल्यानंतर या शाळेचे मुख्याध्यापक मनोजंजन साहू यांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच जिल्हा प्रशासनाकडून या प्रकरणाची सखोल चौकशी केली जात आहे. जिल्हाधिकाऱ्यांनीही ही घटना नेमकी कशी घडली? घटना घडली तेव्हा वॉर्डन कुठे होते याचा तपास करा? असा आदेश दिला आहे.