मैत्रीत मिठाचा खडा का पडला ? एका क्षणात दोन मित्रांचा संसार झाला उद्ध्वस्त, नेमकं काय घडलं ?
ते दोघे एकत्र काम करत होते. यामुळे त्यांच्यात निखळ मैत्री होती. पण पतीच्या मनात वेगळाच संशय होता. पुढे जे घडले त्याने दोन संसार उद्धवस्त झाले.

दिल्ली : राजधानी नवी दिल्लीमध्ये एक खळबळजनक घटना घडली आहे. खाजगी शाळेत कामाला असलेल्या महिलेची स्कूलबसच्या चालकाशी मैत्री झाली होती. महिलेने त्या स्कूल बसचालकासोबत निखळ मैत्री जपली होती. मात्र महिलेच्या पतीच्या मनात संशयाचे भलतेच काहूर माजले होते. पत्नी आणि स्कूल बसचालक या दोघांमध्ये प्रेमसंबंध सुरू असल्याचा संशय महिलेच्या पतीला आला. हाच संशय अखेर स्कूल बस चालकाच्या जीवावर बेतला. महिलेच्या पतीने चालकाची हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. गोविंदपुरी परिसरात ही धक्कादायक घटना घडली. स्कूल बसचालकाच्या हत्येप्रकरणी दिल्ली पोलिसांनी 33 वर्षीय आरोपी सोनू उर्फ अनिल याला अटक केली आहे.
दोघांमध्ये अनैतिक प्रेमसंबंध असल्याचा संशय आला अन्…
सोनू हा नवी दिल्लीतील नवजीवन कॅम्प परिसरातील रहिवासी आहे. हत्या करण्यात आलेला स्कूल बसचालक वीरेंद्र हा पत्नीशी अधिक जवळीक साधत असल्याचा संशय सोनूला आला होता. त्यामुळे वीरेंद्रला कायमचा धडा शिकवण्याचा प्लान सोनूच्या डोक्यात शिजला होता. वीरेंद्र आणि आपली पत्नी एकांतात भेटतात, असा सोनूला संशय होता. याच संशयातून सोनूने वीरेंद्रच्या हत्येचा कट रचला. त्यानंतर गुरुवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास सोनूने वीरेंद्रची हत्या केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.
भल्या पहाटेच पोलिसांना कॉल आला आणि…
गोविंदपुरी परिसरातील गुरु रविदास मार्गावर असलेल्या मच्छी बाजारमध्ये काहीतरी अनुचित घटना घडल्याचा अज्ञात कॉल दिल्ली पोलिसांना आला. सकाळी आलेल्या अज्ञात कॉलमुळे पोलीस गोंधळून गेले होते. गस्तीवर असलेल्या पोलिसांच्या एका गाडीने तातडीने मच्छी बाजारच्या दिशेने कूच केली.
मात्र रक्तबंबळ अवस्थेत खाली पडलेला वीरेंद्रला स्थानिक रहिवाशांनी अधिक उपचारासाठी आधीच रुग्णालयात हलवले होते. पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. प्राथमिक उपचार सुरू करण्याआधीच वीरेंद्रचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. त्यानंतर स्थानिक रहिवाशांचे जबाब नोंदवून घेत पोलिसांनी आरोपी सोनूविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करीत, त्याला अटक केली.
