Dombivali Crime : सोशल मीडियात फोटो व्हायरल केल्याने महिलेने उचलले टोकाचे पाऊल, छळाला कंटाळलेल्या महिलेने थेट…

हल्ली सोशल मीडियाचा गैरवापर करत गुन्हेगारी कृत्य करण्याच्या घटना वाढल्या आहेत. अशीच एक घटना डोंबिवलीत उघडकीस आली आहे. या घटनेमुळे डोंबिवलीत खळबळ माजली आहे.

Dombivali Crime : सोशल मीडियात फोटो व्हायरल केल्याने महिलेने उचलले टोकाचे पाऊल, छळाला कंटाळलेल्या महिलेने थेट...
डोंबिवलीत सोशल मीडियावर फोटो व्हायरल करत महिलेची बदनामी
Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Aug 26, 2023 | 5:09 PM

डोंबिवली / 26 ऑगस्ट 2023 : डोंबिवलीत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मैत्रीतून महिलेसोबत काढलेले फोटो सोशल मीडियवर व्हायरल करण्याची धमकी देत एक तरुण महिलेकडे वारंवार पैशाची मागणी करत होता. मात्र महिलेकडून पैसे मिळत नसल्याने तरुणाने महिलेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले. यामुळे समाजात बदनामी झाल्याने महिलेने टोकाचे पाऊल उचलत जीवन संपवल्याची घटना घडली आहे. डोंबिवलीतील देसलेपाडा येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी महिलेच्या नातेवाईकाच्या फिर्यादीवरुन मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजय ऋषीपाल असे आरोपी तरुणाचे नाव आहे.

काय घडलं नेमकं?

आरोपी आणि पीडित महिला दोघेही हरयाणातील एकाच गावातील रहिवासी आहेत. दोघेही कामानिमित्त डोंबिवलीत राहत होते. डोंबिवलीत मजुरीची काम करुन आपला उदरनिर्वाह चालवत होते. एकाच गावचे असल्याने महिला आणि तरुणामध्ये मैत्री होती. याच मैत्रीतून दोघांनी एकत्र फोटो काढले होते. मात्र तरुणाने या फोटोंचा गैरवापर सुरु केला. हे फोटो इंटरनेटवर टाकण्याची धमकी देत तीन महिन्यांपासून तरुण महिलेकडे पैशांची मागणी करत होता.

मात्र महिला पैसे सक्षम नसल्याने तिच्याकडून पैसे मिळत नव्हते. यामुळे संतापलेल्या तरुणाने महिलेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले. फोटो व्हायरल केल्यामुळे समाजात झालेली बदनामी महिला सहन करु शकली नाही. यामुळे तिने टोकाचा निर्णय घेत आपली जीवनयात्रा संपवली. यानंतर महिलेच्या नातेवाईकांनी मानपाडा पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी सखोल चौकशी केल्यानंतर मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक सर्जेराव पाटील अधिक तपास करत आहेत.