Nanded Crime : अकराशे रुपये भरुन साडे चार महिन्याचे रेशन, 30 हजारात मोटार सायकल, सेवाभावी संस्थेकडूनच नागरिकांना गंडा

| Updated on: Sep 01, 2023 | 11:47 AM

हल्ली फसवणुकीचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. मात्र नांदेडमधील हा नवा फसवणुकीचा प्रकार पाहून तुम्हीही हैराण झाल्याशिवाय राहणार नाही.

Nanded Crime : अकराशे रुपये भरुन साडे चार महिन्याचे रेशन, 30 हजारात मोटार सायकल, सेवाभावी संस्थेकडूनच नागरिकांना गंडा
नांदेडमध्ये मोठा घोटाळा उघड
Image Credit source: TV9
Follow us on

नांदेड / 1 सप्टेंबर 2023 : हल्ली नागरिकांना विविध आमिष दाखवून आर्थिक फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. शहरापासून ग्रामीण भागापर्यंत हे फसवणुकीचे लोण पसरले आहेत. नांदेडमधील घटना उघड होताच जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. एका सेवाभावी संस्थेनेच नागरिकांनी विविध आमिष दाखवून तब्बल 100 कोटींचा गंडा घातला आहे. याप्रकरणी नांदेडमधील वजीराबाद पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. बाबासाहेब सुतारे असे मुख्य आरोपीचे नाव असून, मूळचा हिंगोलीतील औंढा येथील आहे. गोर गरिबांना स्वस्तात अन्न धान्याचा पुरवठा करण्याचा उद्देश ठेवून या संस्थेची सुरुवात करण्यात आली होती.

योजनांची माहिती देण्यासाठी 700 एजंटची नेमणूक

हिंगोलीतील बाबासाहेब सुतारे याने आपल्या अन्य दोन साथीदारांसह एक वर्षापूर्वी नांदेडमध्ये सेवाभावी संस्था सुरु करण्यात आली होती. महाराष्ट्र राज्य अन्नदाता सेवा केंद्र अंतर्गत जनकल्याण बांधकाम कामगार विभाग नावाने ही संस्था सुरु करण्यात आली होती. नांदेडसह हिंगोली आणि परभणी येथे सुमारे 700 एजंट नेमून संस्थेमार्फत विविध योजनांचा प्रचार करण्यात आला.

काय होत्या योजना?

तीन महिने अकराशे रूपये भरुन चार महिन्यांचे अन्नधान्य, 30 हजारात मोटर सायकल, 2200 रूपयांत लॅपटॉप, शिलाई मशीन अशा विविध योजनांचे आमिष नागरिकांना दाखवण्यात आले. या आमिषाला बळी पडून तीन जिल्ह्यातील लाखो लोकांनी संस्थेकडे विविध योजनेत पैसे भरले. सुरवातीला लोकांना लाभ मिळत होता. मात्र नंतर लोकांना योजनांचा लाभ देणे संस्थेने बंद केले.

हे सुद्धा वाचा

तिघांना अटक, आठ जण फरार

यानंतर नागरिकांनी वजीराबाद पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली. नागरिकांच्या तक्रारीवरुन वजीराबाद पोलिसांनी संस्था चालकांविरोधात गुन्हा दाखल करून तीन जणांना अटक केली. यात आणखी आठ आरोपींचा समावेश असून, ते सध्या फरार आहेत. पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहेत.