Swargate Rape Case : पुढच्या 15 दिवसात… स्वारगेट एसटी डेपो बलात्कार प्रकरणात महत्त्वाची अपडेट
Swargate Rape Case : मागच्या आठवड्यात स्वारगेट बलात्कार प्रकरणाने सगळ्या राज्याला हादरवून सोडलं होतं. पुण्यात एसटी डेपोत एका बसमध्ये तरुणीवर बलात्कार झाला. या नंतर पुणे पोलिसांनी तातडीने पावलं उचलत आरोपीला अटक केली. आता या प्रकरणात एक महत्त्वाची अपडेट आहे.

मागच्या आठवड्यात स्वारगेट एसटी डेपो परिसरात एका बसमध्ये तरुणीवर बलात्कार झाला होता. या घटनेने सगळ्या राज्याला हादरवून सोडलं होतं. या प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेला गुन्हा घडल्यानंतर 72 तासांनी अटक करण्यात आली होती. पोलिसांनी आरोपी दत्तात्रय गाडेला पकडण्यासाठी 13 टीम्स बनवल्या होत्या. पोलिसांनी आरोपीला त्याच्या गावातील शेतातून अटक केली होती. कोर्टाने आरोपीला 12 मार्चपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. आरोपी दत्तात्रय गाडेची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरुपाची आहे. त्याच्यावर याआधी सुद्धा अन्य गुन्ह्यांची नोंद आहे. स्वारगेट एसटी डेपो बलात्कार प्रकरणात आता पुणे पोलीस एक महत्त्वाच पाऊल उचलणार आहेत.
स्वारगेट एसटी बसस्थानकात तरुणीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीचा डीएनए अहवाल आणि न्यायवैद्यक पुरावे एकत्रित करून साधारण 15 दिवसांत न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे. या प्रकरणात तरुणीसह तिचे कुटुंबीय आणि मित्राचा जबाब नोंदविण्यात आला आहे. पीडित तरुणी स्वारगेट परिसरात ज्या वाहनाने आली त्या कारचा कॅबचालक आणि संबंधित शिवशाही बसच्या वाहकाचाही जबाब घेण्यात आला आहे.
गुन्हे शाखेने काय म्हटलं?
घटनास्थळावरील सीसीटीव्ही चित्रीकरण, ससून रुग्णालयाकडून प्राप्त वैद्यकीय चाचणी अहवाल, बसच्या न्यायवैद्यक तपासणीचा अहवाल अशा पुराव्यांचा आरोपपत्रात समावेश असेल. या गुन्ह्याच्या तपासात कोणत्याही त्रुटी राहणार नाहीत. तरुणीला न्याय मिळवून देण्यासाठी सुटसुटीत आणि न्यायवैद्यक पुराव्यानिशी आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे, असे गुन्हे शाखेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. स्वारगेट अत्याचार प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. गुन्हे शाखेला तातडीने तपास ताब्यात घेण्याचे आदेश पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले.
सरकारी वकिल कोर्टात काय म्हणाले?
या प्रकरणात आरोपीच्या वकिलांनी आरोपीचा बचाव करताना कोर्टात मोठा दावा केला. मुलगी स्वतःहून बसमध्ये गेली. मुलीच्या मर्जीने शारीरिक संबध प्रस्थापित झाले, असं आरोपीचे वकील कोर्टात म्हणाले. सरकारी वकिलांनी आरोपीच्या वकिलांचा दावा खोडून काढला. आरोपी विरोधात 6 गुन्हे दाखल आहे. त्यातील 5 महिला फिर्यादी आहेत. यावरून आरोपीचा महिलाकडे बघण्याचा दृष्टीकोन समजतो असं युक्तीवाद सरकारी वकिलांनी कोर्टात केला.
