Maharashtra Police: आरोपींनी अपहरण केलेल्या पोलिसाची आपबिती, ‘दोन तास आरोपींच्या ताब्यात…’
Crime news: पप्पी सिंग याच्यासोबत शंभर मुले काम करतो. त्याचे सर्वच राज्यात नेटवर्क आहे. तो हत्यारांची विक्री करतो. काही महिन्यांपासून आम्ही त्याच्या मार्गावर होतो. त्यामुळे त्याला ताब्यात घेणे आमच्यासाठी मोठे यश होते. त्यामुळे मी माझ्या जीवाची पर्वा न करता पप्पी सिंग याला सोडू नका

जळगाव पोलीस दलातील पोलीस कर्मचाऱ्याचे आरोपींना अपहरण केले होते. आरोपींना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांना जमावाने घेरुन त्यातील एका पोलीस कर्मचाऱ्याला मध्य प्रदेशात नेले होते. त्यानंतर त्या कर्मचाऱ्यास मध्य प्रदेशच्या सीमेत नेले होते. त्यानंतर त्या कर्मचाऱ्याची सुटका करण्यात आली. दरम्यान, या घटनेत अपहरण झालेल्या शशिकांत पारधी यांनी घटनेचा थरार ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना सांगितला.
असा घडला होता थरार
पोलीस कर्मचारी शशिकांत पारधी यांनी घटनेची आपबिती सांगितली. ते म्हणाले, आम्ही पप्पी सिंग या आरोपीला आणण्यासाठी गेलो असताना आमच्यावर फायरिंग करण्यात आली. आमच्याकडूनही हवेत फायरिंग करण्यात आले. पप्पी सिंग याला ताब्यात घेतले. परंतु मोठ्या जमावाने आम्हाला घेरले. त्यानंतर मला जमावाने मोटारसायकलवर बसून जंगलात नेले. मध्य प्रदेशातील पार उमर्टीत नेले. आमच्या माणसाला सोडा नंतर तुला सोडतो, असा फोन त्यांना करायला लावला. परंतु मी फोनवर आरोपीला सोडू नका, माझ्या जीवाची पर्वा करू नका, असे मी माझ्यासोबत काम करणाऱ्या पोलिसांना सांगितले. त्यावेळी मी आरोपींना सांगितले की, आता महाराष्ट्र पोलीस अलर्ट झाली आहे. आरोपींनी माझ्यावर डाव्या बाजूने गोळीबार करुन मला घाबवरण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मी त्यांना म्हणालो, तुम्ही मला ठार मारु शकतात. परंतु त्यानंतर तुम्हाला वाईट परिणाम भोगावे लागतील. दरम्यान, मध्य प्रदेश पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यांनी माझी सुटका केली. मी जवळपास एक ते दोन तास आरोपींच्या ताब्यात होतो.
आरोपीचे मोठे नेटवर्क
पोलीस कर्मचारी शशिकांत पारधी म्हणाले, पप्पी सिंग याच्यासोबत शंभर मुले काम करतो. त्याचे सर्वच राज्यात नेटवर्क आहे. तो हत्यारांची विक्री करतो. काही महिन्यांपासून आम्ही त्याच्या मार्गावर होतो. त्यामुळे त्याला ताब्यात घेणे आमच्यासाठी मोठे यश होते. त्यामुळे मी माझ्या जीवाची पर्वा न करता पप्पी सिंग याला सोडू नका, असे मी म्हणालो.




अशी घडली होती घटना
एक अधिकारी आणि सात जणांच्या पथकावर शंभर ते दीडशे जणांच्या जमावाने हल्ला केला होता. यावेळी संबंधितांनी फायरिंग सुद्धा केली होती. त्यात शशिकांत पारधी या पोलीस कर्मचाऱ्याचे अपहरण झाले होते. या अपहरण झालेल्या शशिकांत पारधी या कर्मचाऱ्याची सुखरूप सुटका करण्यात आली. त्याला किरकोळ मार लागला असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. जमावाच्या हल्ल्यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक शेषराव नितनवरे आणि किरण पारधी हे जखमी आहे. त्यांना उपचारासाठी चोपडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.