विमानाने परदेशात जाऊन दरोडे टाकायचा, कल्याणच्या चोराचा चेन्नईत एन्काऊंटर
कल्याण आंबिवलीतील इराणी वस्तीतून येणाऱ्या आंतरराज्यीय चोरांच्या टोळीचा चेन्नईत एन्काउंटर झाला. जफर गुलाम हुसेन इराणी या टोळीतील एका सदस्याचा पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू झाला, तर सलमान मेश्राम आणि अमजद इराणी गंभीर जखमी झाले.

कल्याण आंबिवली परिसरातील इराणी वस्तीमध्ये राहणाऱ्या एका सराईत चोराचा चेन्नईत पोलिसांनी एन्काऊंटर केला. विदेशात विमानाने प्रवास करून दरोडे टाकणाऱ्या आंतरराज्यीय टोळीतील हा सदस्य होता. या कारवाईत त्याचे दोन साथीदार गंभीर जखमी झाले आहे. हे सर्व आरोपी विविध गुन्ह्यांमध्ये पोलिसांच्या रडारवर होते. सलमान मेश्राम, अमजद इराणी, आणि जाफर गुलाम हुसेन इराणी अशी या टोळीतील सदस्यांची नावे आहेत. यातील जाफर गुलाम इराणी याचा पोलिसांनी एन्काऊंटर केला आहे.
नेमकं काय घडलं?
कल्याणच्या आंबिवली परिसरात मोठी इराणी वस्ती आहे. या भागातील अनेक जण सोनसाखळी चोरी आणि घरफोडीच्या गुन्ह्यांमध्ये सक्रिय आहेत. महाराष्ट्र पोलिसांनी यापूर्वी या भागातील अनेक चोरांना अटक करून तुरुंगात पाठवले आहे. पण आता या भागातील काही चोर राज्याबाहेरही सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे. हे चोर विमानाने प्रवास करत चोऱ्या करत असल्याचे समोर आले आहे.
विमानाने प्रवास करून दरोडे टाकणाऱ्या आंतरराज्यीय टोळीत सलमान मेश्राम, अमजद इराणी आणि जाफर गुलाम हुसेन इराणी या तिघांचा समावेश होता. हे आरोपी महाराष्ट्रातून इतर राज्यांमध्ये विमानाने जाऊन चोऱ्या करत होते. काल, चेन्नईत हे आरोपी चोरी करण्यासाठी गेले होते. त्यांनी दहा किलो सोन्याची चोरी केली. ही चोरी केल्यानंतर पळून जात असताना चेन्नई पोलिसांनी त्यांना घेरले. यावेळी पोलिसांसोबत झालेल्या झटापटीदरम्यान जाफर गुलाम इराणी याचा चेन्नई पोलिसांनी एन्काऊंटर केला. तर सलमान मेश्राम आणि अमजद इराणी हे गंभीर जखमी झाले.
दरम्यान, कल्याण आंबिवलीतून आरोपींच्या नातेवाईकांनी मृतदेह आणण्यासाठी चेन्नईकडे प्रस्थान केले आहे. या घटनेमुळे कल्याण परिसरात खळबळ उडाली आहे. आंतरराज्यीय स्तरावर कार्यरत असलेल्या या चोर टोळीच्या कार्यपद्धतीमुळे पोलीस यंत्रणाही सतर्क झाली आहे.
भिवंडीत दोन सराईत चोरट्यांना अटक
तर दुसरीकडे भिवंडी नारपोली येथील गोडाऊन मधून 26 लॅपटॉप चोरी करणाऱ्या सराईत दोन चोरट्यांना भिवंडी गुन्हे शाखेने अटक केली आहे. हे आरोपी सराईत गुन्हेगार आहे. या चोरांकडून घरफोडी चोरीच्या गुन्ह्यातील गाडीसह 24 लाख 65 हजार रुपये किमतीचा लॅपटॉप आरोपीकडून हस्तगत करण्यात आला आहे. दिलीप चव्हाण आणि अर्जुन राठोड अशा या दोन आरोपींची नावे आहे. त्यांना गुन्हे शाखेने अटक केली आहे.
तसेच ठाण्यातील नौपाडा परिसरात काही दिवसापूर्वी 14 दुकाने फोडून आरोपी फरार झाले होते. या गुन्ह्यात दोन वॉचमन असणाऱ्या आरोपींना देखील अटक करून 9 गुन्हे उघडकीस आणले आहेत. या आरोपीकडून दोन लाख 60 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल ठाणे गुन्हे शाखा यांनी हस्तगत केला आहे.